अहमदनगर : किशोरभार्इंच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली, तो मंतरलेला काळ होता. स्वातंत्र्य चळवळीच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रप्रेमाने आणि उच्च प्रतीच्या ध्येयवादाने भारावलेले वातावरण शिगेला पोहोचले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर नवभारताच्या उभारणीसाठी आपल्याला खूप काही करावयाचे आहे. या जिद्दीने तरुण पिढी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चळवळीत उतरली होती. अच्युतराव आणि रावसाहेब हे पटवर्धन बंधू अहमदनगर जिल्ह्यातले आणि चळवळीतील अग्रणी नेते म्हणून उदयास आले होते. जिल्ह्यातील तरुणांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. अशा वातावरणात किशोर पवार कार्यकर्ते म्हणून चळवळीत उतरले. त्यावेळी ते कोपरगाव तालुक्यातील साकरवाडीच्या खाजगी साखर कारखान्यात कामगार म्हणून काम करीत होते. काँग्रेस अंतर्गत समाजवादी गट म्हणून काम करणाºया मंडळींनी साखर कामगारांची संघटना बांधायला सुरुवात केली होती. नगर जिल्ह्यातील संघटनेची जबाबदारी रावसाहेब पटवर्धन पहात होते. किशोरभाई त्यांच्या संपर्कात आले आणि साखर कामगारांचे संघटन बांधू लागले. जोडीला राष्ट्र सेवा दलाच्या शाखाही चालवू लागले. अशा प्रकारे स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळातच रावसाहेब पटवर्धनांच्या मार्गदर्शनाखाली किशोरभार्इंनी कोपरगाव तालुका साखर कामगार सभा संघटित केली. जिल्ह्यात प्रथम केवळ खाजगी साखर कारखाने होते. स्वातंत्र्योत्तर काळात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली. ग्रामीण भागातील या साखर कामगारांचे प्रश्न घेऊन खाजगी व सहकारी क्षेत्रात कामगारांचे लढे साखर कामगार सभेने यशस्वीपणे लढविले. रावसाहेब पटवर्धनांचे मार्गदर्शन आणि किशोर पवार यांचे संघटन कौशल्य यातून कोपरगाव तालुका साखर कामगार सभा ही बलाढ्य कामगार संघटना उभी राहिली. तिचे समर्थ नेतृत्त्व किशोरभार्इंनी जवळपास सात दशके केले. देशातील कामगार चळवळीत या कामगार संघटनेचे स्थान वैशिष्ट्यपूर्र्ण आहे आणि त्याचे श्रेय किशोरभार्इंच्या नेतृत्वाला आहे. कामगारांच्या समस्या सोडवितांना जो संघर्ष झाला त्याला नेहमी विधायक वळण देण्याची खबरदारी किशोरभार्इंनी घेतली. कामगारांचे प्रश्न तर सुटलेच पाहिजेत पण त्या सोबतच ज्या साखर उद्योगावर कामगारांची रोजीरोटी अवलंबून आहे. तो उद्योगही टिकला पाहिजे. अशीच किशोरभार्इंची भूमिका होती़ त्यामुळेच देशातील विविध साखर कामगार संघटनांना एकत्र आणून त्यांचा समन्वय घडविण्यात किशोरभार्इंना यश आले़ साखर कामगार संघटनांचे समन्वयक म्हणून त्यांनी देशातील कामगारांचे समर्थपणे नेतृत्व केले. कोपरगाव तालुका साखर कामगार सभेला रावसाहेब पटवर्धन, नानासाहेब गोरे, प्रा.मधू दंडवते, डॉ.बापूसाहेब काळदाते असे दिग्गज अध्यक्ष लाभले आणि अगदी सुरुवातीपासून तर २ जानेवारी २०१३ पर्यंत किशोरभार्इंसारखा कर्तृत्ववान नेता सरचिटणीस म्हणून मिळाला. खाजगी आणि सहकारी साखर उद्योगाने साखर कामगार सभेच्या न्याय संघर्षाची आणि विधायक सहकार्याची नेहमीच बूज राखली. त्यामुळेच सोमय्याशेठजी, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्याशी संघर्ष करुनही या कामगार नेत्याचे आणि वरील कारखानदारांचे संबंध अखेरपर्यंत सौहार्दपूर्ण राहिले. मालक आणि कामगार यांच्यातील सामंजस्याशिवाय उद्योगाची, कामगारांची प्रगती नाही, याची परस्परांनी जाणीव ठेवली. कोपरगाव तालुका साखर कामगार सभा हे केवळ कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचे दुकान नाही. तर ती एका नवसमाज रचनेचा ध्यास घेतलेली व त्यासाठी कृतिशीलपणे आपला वाटा उचलणारी परिवर्तनवादी संघटना आहे. याची जाणीव कामगार सभेच्या सर्वच नेत्यांनी साखर कामगारांमध्ये रुजविली. आपल्या संघटनेला परिवर्तनवादी, पुरोगामी सामाजिक व राजकीय विचारांचे भान देण्याचे काम किशोरभार्इंनी केले. त्यामुळेच साखर कामगार सभेचे सभासद आणि कार्यकर्ते हे कामगारांचा लढा उभारतानाच स्वातंत्र्य आंदोलन, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती चळवळ, आणीबाणीचा संघर्ष, महागाई विरोधी चळवळी, विविध सामाजिक प्रश्नांवर उभी राहिलेली आंदोलने यातही अग्रभागी राहिले. राष्ट्रावरील संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे सरसावले आणि समाजवादी पक्षाच्या राजकीय लढाईतही सामील झाले. राजकारणाशी आमचा संबंध नाही अशी सोवळी भूमिका या मंडळींनी स्वीकारली नाही. कारण स्वत: किशोरभाई समाजवादी पक्षाचे अनेक वर्ष पदाधिकारी आणि काही काळ प्रदेशाध्यक्षही राहिले. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून किशोरभार्इंचा कार्यकर्ता म्हणून पिंड घडला. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्र सेवा दलाचे संघटन नुकतेच कुठे उभे राहत होते. तेव्हाच त्यांचा सेवादलाशी संबंध आला. त्यावेळी साने गुरुजी, एस.एम. जोशी यांच्यासारखे नेते राष्ट्र सेवा दल ग्रामीण भागात वाढविण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी त्यांना कोपरगाव भागात किशोर पवारांसारखा तरुण आणि धडाडीचा कार्यकर्ता हाताशी लागला. काही काळ किशोरभार्इंनी सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केले. या भागात त्यांनी सेवा दलाच्या शाखांचे जाळे उभे केले. त्यातून गंगाधरराव गवारे मामा, भास्करराव बोरावके, व्ही.के.कुलकर्णी, शब्बीर शेख, पुरुषोत्तम पगारे अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची साथ त्यांना मिळाली. सेवा दलाने अंगीकृत केलेल्या शाखा, मेळावे, शिबिरे, कलापथक, सेवा पथक, अभ्यास मंडळ, व्याख्यानमाला, साधना, राष्ट्र सेवा दल पत्रिकेसारखी नियतकालिके यांना जाहिराती, दरवर्षीचे राष्ट्र सेवा दलाचे कॅलेंडर आणि सेवा दलासाठी वेळोवेळी उभारण्यात येणारा निधी यासाठी किशोरभार्इंनी अक्षरश: वाघासारखे काम केले. सेवा दलाला काही कमी पडू द्यायचे नाही असे त्यांचे व्रतच होते. किशोरभार्इंनी आपला राजकीय प्रवास समाजवादी कार्यकर्ता म्हणून सुरु केला आणि अखेरपर्यंत ते समाजवादीच राहिले. पक्षांची नावे बदलली तरी समाजवादी मंडळींनी जे राजकीय पक्ष बांधले.त्यात सर्वांबरोबर किशोरभाई सामील झाले. त्यांच्या सर्व लढ्यात आघाडीवर राहिले. त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही लढविल्या. पण त्यात यश मिळाले नाही. किशोरभार्इंच्या सत्तर वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी विविध क्षेत्रातील असंख्य नामवंतांशी स्नेहाचे संबंध ठेवले. त्यांचे व्यक्तिमत्त्व पक्षाच्या व संघटनेच्या मर्यादा ओलांडून किती दूरवर पोहचले होते. याची साक्ष पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिरात तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते किशोरभार्इंचा जो गौरव समारंभ झाला व त्याला ज्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित राहिले त्यातूनच मिळाली. याप्रसंगी शुभेच्छा देतांना कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणाले,‘समतेचा ध्वज याच्या हाती, दुर्बल, दलितांचा हा साथीआज होतसे गौरव याचा, म्हणजे गौरव माणुसकीचा!’स्वातंत्र्य आंदोलनातून उदयास आलेल्या व नवभारताचे स्वप्न फुलविण्यासाठी आयुष्य दिलेल्या या लोकसंग्राहक नेत्याला प्रणाम!
लेखक - मा. रा. लामखडे (ज्येष्ठ साहित्यिक)