बोधेगाव (ता.शेवगाव) येथील केदारेश्वर साखर कारखान्याची ३१वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता.३०) सुमननगर येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी केदारेश्वरचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे होते, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश घनवट, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, ज्येष्ठ संचालक त्रिंबक चेमटे, भाऊसाहेब मुंढे, सुरेशचंद्र होळकर, विठ्ठलराव अभंग, तुषार वैद्य, सतीश गव्हाणे, रणजित घुगे, संदीप बोडखे, मयुर हूंडेकरी, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
संचालक माधवराव काटे यांनी नूतन नामकरणाचा ठराव मांडला. तसेच विषय पत्रिकेतील सर्व विषय सभेपुढे मांडून मंजूर करण्यात आले. यावेळी ॲड. प्रताप ढाकणे म्हणाले, केदारेश्वर कारखाना हा ऊसतोडणी कामगारांचा असून, या कारखान्यास संघर्षाचा वारसा आहे. या परिसरातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी केदारेश्वर भक्कमपणे उभा राहून संकटकाळी आर्थिक मदत देत आहे. मात्र इतर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही का मदत देऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला, तर शेतकी विभागाच्या अहवालानुसार दोन दिवसांत शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजारांची मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेसाठी संस्थापक अध्यक्ष बबनराव ढाकणे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी, तर आभार डाॅ. प्रकाश घनवट, तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी मानले.
फोटो - केदारेश्वर
बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याच्या ३१व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, संचालक मंडळ आदी उपस्थित होते.