अहमदनगर : अहमदनगर ते पुणे या दरम्यान धावलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. आज रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. या वर्षीच्या १ जूनला पहिल्या एसटीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
उद्या, गुरुवारी अहमदनगर येथील अमरधाम येथे सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली एसटी बस १ जून १९४८ रोजी अहमदनगरच्या माळीवाडा भागातून पुण्यापर्यंत धावली होती. त्या बसचे पहिले चालक किसन राऊत आणि पहिले वाहक लक्ष्मण केवटे होते. हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातीलच होते. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी केवटे यांनी अखेरचा श्वास घेतला. एसटी महामंडळाकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
८० रुपये पगार
केवटे ज्यावेळी महामंडळात भरती झाले तेव्हा त्यांना ८० रुपये पगार मिळत होता. नगर ते पुणे या अंतरासाठी पहिल्या बसचे भाडे अडीच रुपये होते. एसटीचा हा इतिहास लक्षात घेता महाराष्ट्राची पहिली इलेक्ट्रिक बसही नगर ते पुणे या मार्गावर १ जून २०२२ रोजी सुरू करण्यात आली. त्यावेळीही केवटे उपस्थित होते. म्हणजे महाराष्ट्राची पहिली बस ते इलेक्ट्रिक बस या दोन्ही सुवर्ण घटनांचे ते साक्षीदार होते.
लक्ष्मण केवटे यांच्याबद्दल एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये आदराची भावना होती. एसटी बसचा सुरुवातीचा काळ आणि आताचा हे दोन्ही काळ लक्ष्मण केवटे यांनी पाहिला आहे. त्यांच्या नोकरीची सुरुवात जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली होती. त्या काळात बसचे भाडे फक्त अडीच रुपये होते. लक्ष्मण केवटे यांच्या जाण्याने एसटी बसचा चालता-बोलता इतिहास हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.