चंद्रकांत शेळकेअहमदनगर : हजेरी कमी असल्याने दहावीच्या परीक्षेस बसता येणार नाही, असा पवित्रा सीबीएसई बोर्डाने घेतल्यानंतर त्याविरोधात पालकांनी कणखर भूमिका घेत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयानेही अवघ्या दोन दिवसांत सुनावणी घेऊन आदेश दिला. परीक्षेच्या आधी काही तास विद्यार्थ्याचे हॉलतिकीट आले, त्याने परीक्षा दिली अन् सोमवारीलागलेल्या निकालात तो विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला. एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर यश मिळतेच, हेच या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे.यश भारत झेंडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. यश नगर शहरातील एका इंग्रजी शाळेत दहावीला शिकत होता. परंतु दुर्धर आजारामुळे तो शाळेतील हजेरी पूर्ण करू शकला नाही. त्याची हजेरी केवळ ४६.७९ टक्केच भरली. परीक्षेसाठी ७० टक्के हजेरी आवश्यक असते. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने त्याला परीक्षा देण्यास शाळेला नकार दिला. परंतु या निर्णयाने ना यश डगमगला ना त्याचे आई-वडील.यशच्या आई शीला या बीएसएनएलमध्ये नोकरीस आहेत, तर वडील भारत हेही नोकरीला आहेत. त्यांनी ५ मार्च २०१९ रोजी सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखलकेली. विशेष म्हणजे यशची दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार होती. दोन दिवसांत न्यायालयात सुनावणी होऊन निकाल व त्यानंतर परीक्षेचे हॉलतिकिट मिळणे या बाबी केवळ अशक्यप्राय होत्या.परंतु झेंडे परिवाराच्या वतीने चारूता देशमुख यांनी केलेल्या प्रभावीयुक्तिवादामुळे न्यायालयाने त्वरित सुनावणी घेऊन एकाच दिवसात निकाल देत यशला त्वरित हॉलतिकीट देण्याचा आदेश सीबीएसई बोर्डाला दिला. त्यामुळे परीक्षेच्या दोन तास आधी यशला हॉलतिकीट मिळाले व तो परीक्षेस पात्र झाला.या सर्व द्राविडी प्राणायामानंतर त्याने चिकाटीने अभ्यास केला. यशच्या आई शीला यांनी तीन महिने सुटी घेऊन यशचा अभ्यास घेतला. भाऊसाहेब ढमाळे, यश ओहोळ, सुमीत सर या खासगी शिक्षकांनी त्याच्या घरगुती शिकवण्या घेऊन त्याला मार्गदर्शन केले.६ मे रोजी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला अन् यश ५१ टक्के मिळवून उत्तीर्ण झाला.केवळ नियमावर बोट ठेवून चालत नाही.यंत्रणेने सारासार व व्यापक विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. या निकालातून अनेक पालकांना प्रेरणा मिळणार आहे. अशा अडचणीच्या स्थितीत घाबरून न जाता धैर्याने तोंड दिले की मार्ग सापडतोच. यश हा शिक्षणासह क्रीडा व इतर क्षेत्रातही अग्रेसर असल्याने न्यायालयाने त्याचा विचार केला. - शीला झेंडे, पालक