पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, डोंगरगणमार्गे नगर-वांबोरी मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्या कमी, अनियमित असल्याने अहमदनगर येथे महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास वर्षभरानंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयात जाऊ लागले आहेत. पिंपळगाव माळवी, डोंगरगण, आढाववाडी येथील विद्यार्थ्यांना नगरला जाण्यासाठी पुरेशा बस नाहीत. असलेल्या बसच्याही वेळा नियमित नाहीत. त्यामुळे त्यांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. बऱ्याचदा तासिका व प्रात्यक्षिके बुडतात. विद्यार्थ्यांना नगरला जाण्यासाठी एसटी बसशिवाय दुसरा पर्यायही नाही. सध्या परीक्षा जवळ आल्यामुळे महाविद्यालयात विज्ञान विभागाचे प्रात्यक्षिके सुरू आहेत. परंतु, बसअभावी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक बुडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने नगर वांबोरी मार्गावर जादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. ----
-----
मी बारावीच्या वर्गात शिकत असून कॉलेजला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही, परंतु वेळेवर बस न मिळाल्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
-प्रतीक्षा झिने,
विद्यार्थिनी, राधाबाई काळे महिला महाविद्यालय
----
२२ पिंपळगाव माळवी
पिंपळगाव माळवी फाट्यावर एसटी बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थिनी.