अहमदनगर : स्वच्छतागृहेच नसल्याने नगर जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी उघड्यावर जात आहेत. शिवाय २०० शाळांमध्ये स्वच्छतागृहे असूनही त्यांची दुरवस्था झाल्याने ते वापराविना आहेत. दरम्यान, नवीन स्वच्छतागृहे व जे बंद आहेत त्यांची दुरुस्ती यासाठी सुमारे १० ते ११ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला आवश्यक आहे. शाळांनी ॲानलाइन मागणी नोंदवली असून, येत्या जूनपर्यंत हा निधी मिळेल, अशी माहिती शिक्षण विभागातून मिळाली.
नगरमध्ये जिल्हा परिषदेच्या (पहिली ते आठवी) ३ हजार ५७३ शाळा आहेत. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह आवश्यक असून गेल्या काही वर्षांत सर्व शिक्षा अभियानातून शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यात आली. सध्या ३ हजार २९७ शाळांमध्ये मुलांसाठी, तर ३४८० शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत. परंतु अजूनही २७६ शाळांत मुलांसाठी, तर ९३ ठिकाणी मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आलेले नाहीत. याशिवाय २०५ स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत संबंधित शाळा ऑनलाइन नोंदणी करून स्वच्छतागृहे आहे किंवा नाही, तसेच दुरुस्तीसाठीचा निधी याची माहिती भरते. त्यानुसार केंद्र सरकारकडून ६० टक्के व राज्य सरकारकडून ४० टक्के निधी मंजूर केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या स्थितीमुळे निधी आलेला नाही. येत्या जूनपर्यंत निधीची अपेक्षा आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून समजली.
--------
२०५ शाळांची स्वच्छतागृहे वापराविना
एकूण स्वच्छतागृहांपैकी १४७ मुलांचे व ५८ मुलींचे असे एकूण २०५ स्वच्छतागृहांचे दुरवस्था झाली असून, ते वापराविना आहेत. पाण्याची सोय नसणे, पडझड, दरवाजे नसणे, अस्वच्छता अशा अनेक कारणांनी ही स्वच्छतागृहे बंद आहेत. सरासरी ५० हजार रुपये प्रतिस्वच्छतागृहप्रमाणे सुमारे सव्वाकोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च अपेक्षित आहे.
---------
सर्व शिक्षा अभियानातून शाळांच्या स्वच्छतागृहांसाठी निधी मिळतो. नगर जिल्ह्यातील ज्या शाळांना स्वच्छतागृहे नाहीत किंवा जिथे दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठीचा निधी सर्व शिक्षा अभियानतून मिळणार आहे.
- प्रताप शेळके, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती
----------
पहिली ते आठवी एकूण शाळा-३५७३
मुलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत - २७६
मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत - ९३
वापराविना स्वच्छतागृहे (मुलांची) १४७
वापराविना स्वच्छतागृहे (मुलींची) ५८
--------
फोटो - १८ स्कूल