अहमदनगर : शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शेतातील टाकाऊ पदार्थांपासून कोळसा व वूड व्हिनेगर तयार केले आहे. त्यांच्या या प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.बाळसाहेब भारदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी कोळसा व वूड व्हिनेगर तयार करण्याचा प्रकल्प केला. या प्रकल्पात आकाश शेळके, शिवराज धस, कृष्णा मालुरे, सुमित शेळके (सर्व इयत्ता ९ वी), अथर्व जोशी (इ. ७ वी) यांनी हा प्रकल्प बनविला आहे. त्यांना वर्गशिक्षक अभिषेक जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रकल्पाने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला असून, त्यांचा हा प्रकल्प गुजरातमध्ये होणा-या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडण्यात आला आहे. या यशाबद्दल भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, विश्वस्त हरिश भारदे, प्राचार्य गोरख बडे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.हा प्रकल्प तयार करताना विद्यार्थ्यांनी शेतातील उसाचे पाचरट, बाजरीच्या बनग्या, कपाशीचे खोड व मूळ, डाळिंबाचे काड्या, तूरीचे खोड व मूळ काँग्रेस गवत हे जाळून यापासून कोळसा तयार केला़ त्या कोळशापासून व्हिनेगार तयार केले आहे. विशेष म्हणजे शेतकºयांसाठी जैविक औषध म्हणून हे व्हिनेगार वापरता येणार आहे. रासायनिक औषधांमधील बहुतांश घटक या व्हिनेगरमध्ये आढळले असून, पुणे येथील सारथी लॅबमध्ये या व्हिनेगरची तपासणी करण्यात आली आहे. सारथी लॅबने या व्हिनेगरमध्ये असणारे घटक कोणते व त्यांचे प्रमाण किती याची माहिती या विद्यार्थ्यांना कळविली. तसेच औरंगाबाद येथील आर्या बायोटेक्नॉजी या कंपनीने या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे कौतुक करीत या प्रकल्पाचा वापर करुन व्हिनेगरची निर्मिती करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हिनेगरच्या काही शास्त्रोक्त चाचण्या करण्यात येणार आहेत.
शेतक-यांसाठी हा प्रकल्प फायदेशीर
शेतातील टाकाऊ वस्तूंपासून कोळसा व व्हिनेगर तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे़ शेतकरी घरीच कोळसा व व्हिनेगर तयार करु शकतात. त्यामुळे शेतक-यांना जैविक औषध उपलब्ध होणार असून, या कोळशाचा वापर करुन शेतकरी महिलांना धुरविरहित स्वयंपाक करता येणार आहे. शेतीला जोड व्यवसायही उपलब्ध होऊ शकेल. पीक कापणीनंतर टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावता येणार आहे. प्रदूषण नियंत्रणही साध्य होणार आहे. तसेच पिकांना जैविक औषध मिळाल्यास उत्पादक वाढून जमिन प्रदूषणाचे प्रमाणही घटणार आहे, असे या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रा. अभिषेक जोशी यांनी सांगितले.