पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मूळच्या भारतीय असणाऱ्या व सध्या अमेरिकेत पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. संगीता तोडमल यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
डॉ. तोडमल म्हणाल्या, गरज ही शोधाची जननी असून, आपल्या सभोवती असणाऱ्या जैवविविधता, मानवाच्या गरजा याविषयी याविषयी सखोल अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी फक्त पाठांतराऐवजी प्रात्यक्षिकांवर भर द्यायला हवा. त्यातूनच भावी वैज्ञानिक घडतील.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधून अमेरिकेतील शिक्षण पद्धती, पर्यावरण, अभ्यासक्रम पद्धती, नागरिकांचे व्यवसाय व भारतातील विद्यार्थ्यांना तेथे असलेल्या संधी याविषयी प्रश्न विचारून माहिती घेतली. विद्यार्थ्यांना अमेरिकेत संवाद साधता आल्यामुळे समाधान वाटले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन खळेकर, विज्ञान शिक्षक रमा कोडम, उत्तम शिंदे, आदिनाथ घोरपडे उपस्थित होते. हा संवाद घडवून आणण्यात विद्यालयाचे माजी विद्यार्थी, पत्रकार खासेराव साबळे यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
------
आमचा अमेरिकेतील शास्त्रज्ञांशी संवाद झाल्यामुळे खूप समाधान वाटले. मोलाची माहिती मिळाली. विज्ञानाचा कसा अभ्यास करावा, याविषयी सखोल ज्ञान मिळाले.
-सुयश झिने,
विद्यार्थी, दहावी.
---
२७ पिंपळगाव माळवी
श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साधला अमेरिकेतील शास्त्रज्ञांशी संवाद.