अहमदनगर : मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होत नसल्याने त्याचा निषेध म्हणून स्मायलिंग अस्मिता संघटनेच्या विद्यार्थ्यांनी रविवारी झालेली एमपीएससी परीक्षा काळ्या फिती बांधून तसेच बेंचवर न बसता जमिनीवर बसून दिली.
रविवारी (२१ मार्च) राज्यात विविध ठिकाणी एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा देशभर गाजत असून, मराठा विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू आहे. एमपीएससीच्या संचालकांनी परीक्षा अचानक पुढे ढकलून सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी कृती मध्यंतरी केली होती, असा आरोप ‘स्मायलिंग अस्मिता’चे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केला. सोबतच केंद्र आणि राज्य सरकार मराठा आरक्षणावर निर्णायक भूमिका घेताना दिसत नाहीत. या सर्वांचा निषेध म्हणून राज्यात विविध ठिकाणी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी परीक्षा बेंचवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून आणि काळ्या फिती बांधून दिली. परीक्षेदरम्यान काही ठिकाणी विद्यार्थी कार्यकर्त्यांना जमिनीवर बसण्यास परिवेक्षक तथा परीक्षा नियंत्रकांनी विरोध दर्शवला. परीक्षा महत्त्वाची असल्याकारणाने परीक्षार्थींनी काळ्या फितीवरच समाधान मानले. यापुढील सर्वच परीक्षा अशाचप्रकारे देणार असल्याचे यावेळी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारने सवर्ण आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणावर लोकसभा आणि राज्यसभेत तत्काळ अध्यादेश पारित करून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा, असे मत या आंदोलनात सहभागी मराठा विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
----------
फोटो - २१ स्मायलिंग अस्मिता
मराठा आरक्षणावर निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ स्मायलिंग अस्मिता संघटनेच्या विद्यार्थ्यांनी रविवारी झालेली एमपीएससीची परीक्षा काळ्या फिती लावून दिली.