लोणी - रयत शिक्षण संस्थेच्या राहाता तालुक्यातील लोणी येथील विद्यालयाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे हित जपत विद्यालयात अभ्यास विथ मनोरंजन हा प्रकल्प सुरु केला आहे. लॉकडाऊनच्या काळात हा प्रकल्प ऑनलाईन सुरु केला आहे.
प्रकल्पसाठी विद्यालयातील विविध वर्गांचे व्हाँट्स अँप ग्रुप करण्यात आले आहेत. दररोज या ग्रुपच्या मार्फत विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी काही चाचण्या पुरविल्या जातात. आवश्यक ज्ञानातही नकळत भर पडते. ऑनलाईन गेम्सपासूनही विद्यार्थ्यांना रोखले जाऊ जात आहे. सामान्य ज्ञान,इंग्रजी सारख्या विषयांचा यायध्ये विशेष समावेश करण्यात आला आहे. काही अडचणी समस्या असल्यास विद्यार्थी शिक्षकांशी फोनद्वारे संवाद साधतात.काही विद्यार्थी अवघड समस्या समजावून घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स ,व्हिडिओ कॉल्सचा देखील उपयोग करत आहेत. खरे तर हा कालावधी अधिक सकारात्मक दृष्ट्या घेऊन विद्यार्थ्यांच्या रिकाम्या वेळेचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो.
सध्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारीत आहे. सर्वत्र डिजिटलायझेशनचा वापर शिकविण्याच्या पद्धतीत केला जात आहे. जगभरात घडणाऱ्या घटनांची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होते. सगळेच विद्यार्थी सगळ्याच विषयात निपुण नसतात, आजकालच्या मुलांना गणित, इंग्रजी, विज्ञान व एकूणच वागण्याबोलण्याच्या अनेक समस्या भेडसावतात व ती मुले इतरांच्या तुलनेत मागे पडतात. अशा मुलांसाठी उपचारात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. यांमध्ये विविध युक्त्या, गेम्स वापरून त्यांना विषयाचे आकलन करून देण्यास मदत केली जाते. या पद्धतीद्वारे मुलांच्या प्रत्येक समस्येवर मुळापासून उपचार केले जातात. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. पालक व विद्यार्थीही याबाबत समाधानी असल्याचे प्राचार्य जी.टी.गमे यांनी सांगितले.