अहमदनगर: गणेश मंडळासमोरील ढोल पथकास पोलिसांनी पुढे ढकलल्याच्या कारणावरून महापौर संग्राम जगताप व पोलिसांत चांगलीच शाब्दिक चकमक उडाली़ वाजवूच द्यायचे नसेल तर आम्ही जातो, तुम्हीच करा, विसर्जन, असे सांगत जगतापांसह कार्यकर्ते घोषणाबाजी करत मिरवणुकीतून बाहेर पडले़ त्यामुळे नवीपेठेत काहीवेळ तणावाचे वातावरण होते़ मिरवणुकीतून बाहेर पडलेला जमाव शांततेत बाहेर पडल्यानंतर वातावरण निवळले़ परंतु जगताप यांच्या अधिपत्याखालील गणेश मंडळाची मूर्ती असलेले वाहन भर रस्त्यात उभे राहिल्याने नगरसेवक विक्रम राठोड यांचे मंडळ नवीपेठेतच अडकले आणि या गोंधळातच वेळ संपल्याने गणेश मंडळांना मिरवणूक गुंडाळावी लागली़मंडळांकडून डीजे न लावण्याचा ठराव झाला परंतु काहींनी डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीस सुरुवात केली़ टॅ्रक्टरच्या ट्रॉलीत ध्वनिक्षेपकांची भली मोठी उतरंड आणि त्यावर आकर्षक फिरती रोषणाई करण्यात आली होती़ एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले महापौर संग्राम जगताप व सेनेचे आ़ अनिल राठोड यांचे पुत्र नगरसेवक विक्रम यांच्या अधिपत्याखालील गणेश मंडळ एका मागे एक, असे होते़ राठोड यांचा डीजे तर जगतापांचा ढोल ताशा, अशी मिरवणूक रंगली़ जगताप यांच्या मंडळासमोरील ढोल पथक दोरी धरून डाव खेळत होते़ परंतु हा डाव खेळण्यात अधिक वेळ जात असल्याने पोलीस या पथकास पुढे सरकविण्याचा प्रयत्न करत होते़ मात्र जगताप यांनी पुढे सरकण्यास विरोध केला़ यामुळे कापडबाजारातूनच हा वाद सुरू झाला होता़ नवीपेठेत आल्यानंतर हा वाद विकोपाला गेला़ ढोल पथकास पुढे ढकलण्याच्या कारणावरून पोलीस व जगताप समर्थक ांत बाचाबाची झाली़ ढोल पथकास एकाच जागेवर वाजवू द्या, नंतर पुढे सरकवा, चालता चालता ढोल वाजवता येत नाहीत, असे जगताप यांचे म्हणने होते़ परंतु पोलिसांनी त्यास मज्जाव करत दोरी ओढण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे संतप्त जगताप यांनी वाजवू द्यायचे नसेल तर आम्ही जातो, असे म्हणून जगताप व त्यांचे समर्थक गणेश मूर्ती असलेले वाहन सोडून मिरवणुकीतून निघून गेले़ दरम्यान जगताप यांच्या अधिपत्याखालील मंडळाची गणेशमूर्ती जागेवर उभी असल्याने राठोड यांच्या मंडळास अडथळा निर्माण झाल्याने नवीपेठेत पुन्हा गोंधळ उडाला़ पुढच्या वर्षी लवकर या....अहमदनगर : सजविलेल्या रथात बाप्पांची विराजमान झालेली मूर्ती, गुलालाची उधळण, पुढे ढोल-ताशा आणि डी़जे़ च्या दणदणाटात तल्लीन होवून नाचणारे तरुण अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी शहरवासीयांनी बाप्पांना निरोप दिला़ गणपती बाप्पा मोरया़़़़मंगलमूर्ती मोरया़़़़पुढच्या वर्षी लवकर या़़़या बाप्पांच्या घोषणांनी सोमवारची रात्र बाप्पामय होवून गेली होती़ गेल्या दहा दिवसांपासून पाहुणे म्हणून आलेल्या गणरायांना सोमवारी अकराव्या दिवशी सार्वजनिक मंडळांसह घराघरातून विसर्जन मिरवणूक काढून मंगलमय वातावरणात निरोप दिला़ सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून शहरात ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या़ मानाच्या १४ सार्वजनिक गणेश मंडळांच्या शहरातील रामचंद्रखुंट येथून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिरवणुका निघाल्या़ रामचंद्र खुंट, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक चौक, नवी पेठ, चितळे रोड ते दिल्ली गेट असा मिरवणुकीचा मार्ग होता़ यावर्षी मानाच्या १४ पैकी दोनच सार्वजनिक मंडळांनी डी़जे़ वाजविला़ उर्वरित १२ मंडळाच्या गणपतीसमोर पारंपरिक वाद्य वाजविण्यात आली़ यामध्ये ढोल-ताशा, डोलीबाजा, लेझीम-झांजपथक तर काही ठिकाणी टाळमृदुंगाचाही गजर झाला़ नगरकरांनी यावर्षी पारंपरिक वाद्याला चांगली पसंती दिली़ ज्या मंडळासमोर ढोल-ताशा वाजविला जात होता, तेथे पाहणाऱ्यांची गर्दी जास्त होती़ सायंकाळी रामचंद्र खुंट येथून सुरुवात झालेली मिरवणूक रात्री साडेदहा वाजेपर्यंत नवी पेठ येथेच रेंगाळली होती़ मिरवणूक पुढे काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली़ मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले होते़ त्यामुळे दोन ते तीन चौकांत धक्काबुक्कीचाही प्रकार घडल्याने पोलिसांना थोडाफार बळाचा वापर करावा लागला़ तर १४ मानाच्या गणपतींमध्ये बरेसचे अंतर पडत गेल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली़ विजर्सन मार्गावर कापड बाजार ते दिल्ली गेटपर्यंत रात्री बारावाजेपर्यंत मोठी गर्दी होती़ रात्री बाराची वेळ पूर्ण होताच पोलिसांनी मिरवणुका थांबविण्याचे आदेश दिले़ त्यानंतर सर्व मंडळांनी नेप्ती चौकातील विसर्जन विहिरीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले़विसर्जन विहिरीवर दिवसभर गर्दीसोमवारी सकाळी ९ वाजलेपासून विसर्जन विहिरीवर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती़ महापालिकेच्यावतीने तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती़ तसेच निर्माल्य टाकण्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था होती, मात्र अनेकांनी हे निर्माल्य वाहनात न टाकता खाली रस्त्याच्या परिसरात टाकल्याने मोठी दुर्गंधी निर्माण झाली होती़ गर्दीमुळे नेप्ती चौकात सोमवारी दिवसभर वारंवार वाहतूक कोंडी होत होती़ अखेर पोलिसांनीच आणली गणेशमूर्तीनवीपेठेत महापौर जगताप व पोलिसांत वाद झाले़ जगताप यांनी मिरवणुकीतून माघार घेत थेट कल्याण रस्त्यावरील बाळाजीबुवा विहिरीवर ठाण मांडले़ दरम्यान पोलिसांनी जगताप यांच्या मंडळाची गणेशमूर्ती नवीपेठेतून दिल्लीगेटपर्यंत आणली़ पोलीस गणेश मूर्ती असलेले वाहन घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जगताप यांनी दिल्लीगेट येथे धाव घेतली़ तेथे त्यांनी,‘ आम्ही गणपती घेऊन जातो, पोलिसांनी येण्याची गरज नाही’ असे सांगून कार्यकर्त्यांसह दिल्लीगेट येथून ते मूर्ती असलेले वाहन घेऊन गेले़ त्यांनी रात्री उशिराने गणेशाचे विसर्जन केले़राठोड पिता-पुत्रांची धावपळआ़ अनिल राठोड यांचे पुत्र नगरसेवक विक्रम राठोड यांचे गणेश मंडळ वेळ संपत आली तरी नवीपेठेतच अडकले होते़ जगताप यांनी मिरवणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या मंडळाची गणेशमूर्ती असलेले वाहन रस्त्यात उभे होते़ त्यामुळे राठोड यांचे मंडळ अडकले होते़ ते पुढे आणण्यासाठी आ़ राठोड यांनी नवीपेठेत धाव घेतली़ परंतु रस्त्यात मोठे वाहन असल्याने ते शक्य झाले नाही़ त्यामुळे संतप्त आ़ राठोड यांनी वेळ संपल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी पोलीस चौकीकडे धाव घेतली़ मात्र ते भेटले नाहीत़ अखेर आ़ राठोड यांनी ध्वनीक्षेपकाचा ताबा घेऊन भाषण सुरू केले़ मात्र पोलीस निरीक्षक बलकवडे यांनी वेळ संपला आहे, भाषण करता येणार नाही, असे त्यांना सांगितले आणि मिरवणूक संपली़बालमंडळांचा जल्लोष शहरातील गल्लोगल्ली व चौकाचौकात बालगणेश भक्तांनी एकत्र येत श्रीं ची प्रतिष्ठापना केली होती़ या बालमंडळांच्या सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मिरवणुका निघाल्या होत्या़ बाप्पांच्या घोषणा, ढोल-ताशा, अंगात मंडळाचे टी शर्ट गुलालाची उधळण अशा उत्साहपूर्ण वातावरणात या बालभक्तांनी बाप्पांचे विसर्जन केले़ पर्यावरणपूरक विसर्जन शहरात सुमारे साडेतीन हजार कुटुंबीयांनी श्री गणेशाच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती़ त्यामुळे या भाविकांनी घरातच पाण्याच्या बादलीत मूर्तीचे विसर्जन केले़ तर निर्माल्य परिसरातील झाडांसाठी खत म्हणून वापरण्यात आले़ पाण्याच्या बादलीत मातीची मूर्ती अवघ्या दहा मिनिटात विरघळत असल्याने घरीच विसर्जन करणे सोपे जाते़ अर्बन बॅँकेसमोेर तणावमहापौर जगताप यांचे गणेश मंडळ नवीपेठेतील शहर बँकेसमोर दाखल झाले असता भाजपाचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्याकडून जगताप यांचा जंगी सत्कार करण्यात आला़ सत्कारानंतर गांधीही जगताप यांच्या मिरवणुकीत सामील झाले़ जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, सुवेंद्र आणि महापौर संग्राम जगताप यांना कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतले़ ते तिघेही जल्लोषात सामील झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली़उपनगरातही रंगल्या मिरवणुका शहराबरोबरच सावेडी गाव, बोल्हेगाव, केडगाव व पाईपलाईन रोड परिसरातही विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने मिरवणूक काढून बाप्पांना उत्साहात निरोप देण्यात आला़ या मिरवणुकांत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते़ पाईपलाईन रोड परिसरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला़ काही ठिकाणी ढोल-ताशा तर काही ठिकाणी डीजे वाजविण्यात आला़ सावेडीमध्ये दोन मंडळांनी डीजेचा दणदणाट केला.
विसर्जन मिरवणुकीत नेत्यांची स्टंटबाजी
By admin | Published: September 09, 2014 11:21 PM