जामखेड : संतांनी घडविलेली व शिवकालाने जोपासलेली आपली मराठी भाषा तेजस्वी आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज आज निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमाऐवजी आपण मराठी माध्यमातून शिक्षण घेतले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून पदवीला मराठी विषय असलेले कितीतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊन वर्ग एकचे अधिकारी झालेले आहेत. तेव्हा मराठी माध्यमातून शिक्षणाचा न्यूनगंड काढून टाकावा. मातृभाषेतून विषय आकलन सोपे जाते, असे विचार प्रा. मधुकर राळेभात यांनी मांडले.
मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन नागेश विद्यालयात करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्ष कवी नागेश शेलार होते. काव्य संमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कवींनी वेगवेगळ्या विषयावर कविता सादर करून काव्य संमेलनात चांगलीच रंगत आणली.
यावेळी कवी इंद्रकुमार झांजे यांनी गावाचं गावपण, कवी हरीश हातवटे यांनी तुमच्यासाठी कायपण, कवी किसन आटोळे यांनी नको करू रे व्यसन, कवयित्री संगीता होळकर यांनी शिवरायांचे मावळे, कवी डॉ. संजय राऊत यांनी मिसळ व पाव, कवी डॉ. जतिन काजळे यांनी दिवाळीत माहेरची आठवण, कवी रंगनाथ राळेभात यांनी कोरोना, कवी कुंडल राळेभात यांनी अंधश्रद्धा, कवी दिनेश वराट यांची शेतीवर कविता, तसेच नागेश कॉलेज व कन्या विद्यालयातील निकिता कदम, प्रतीक्षा नेटके, सानिया शेख, पूजा गदादे, सानप या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आ. य. पवार यांनी कवितेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी हरिभाऊ बेलेकर, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा डॉ. विद्या काशीद, डॉ. सविता राऊत, प्रा. बोलभट, प्रा. प्रकाश तांबे, बाळासाहेब आंधळे, प्रा. ज्योती गर्जे, प्रा. प्राची डहाळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मोहनराव डूचे व कवी हरीश हातवटे यांनी केले. आभार प्रा. सखाराम सप्रे यांनी मानले. नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनीही मातृभाषेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन कुंडल राळेभात यांनी केले. प्रा. प्रकाश तांबे यांनी आभार मानले.