अहमदनगर : गॅस सिलिंडर घेतले की एक-दोन दिवसांत १५० ते २०० रुपये अनुदान (सबसिडी) बँक खात्यात जमा झाल्याचा मोबाईलवर संदेश यायचा. हा संदेश आता गेल्या नऊ महिन्यांपासून येणेच बंद झाले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरवरील सबसिडी केंद्र सरकारने बंद केली की काय? अशीच चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता ही सबसिडी अचानक बंद केली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर घेतल्यानंतर जमा होणारे सिलिंडरचे पैसे बँक खात्यात येणेच आता बंद झाले आहे.
केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार गॅस सिलिंडरचे दर, तसेच वेगवेगळ्या शहरांत असणारे वेगवेगळे दर यानुसार सबसिडीची रक्कम होती. नगर जिल्ह्यात अगदी ६० रुपयांपासून ते १५० - २०० रुपयांपर्यंत गॅसवर सबसिडी मिळत होती. मात्र, ही सबसिडी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून बंद झाली आहे. एकीकडे ५० रुपयांनी किंमत वाढली आहे, तर दुसरीकडे अनुदान बंद झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक गॅस सिलिंडर घेतल्यानंतर मोबाईलच्या मेसेजकडे टक लावून पाहत आहे. मात्र, अनुदान जमा झाल्याचा एकही संदेश आठ महिन्यांमध्ये आला नसल्याचे ग्राहक सांगत आहेत. जिल्ह्यात एक सिलिंडर असलेले २ लाख २० हजार १४९, तर दोन सिलिंडर असलेले ४ लाख ५६ हजार १२२ ग्राहक आहेत, असे पुरवठा विभागाने सांगितले. दरम्यान, अनुदान कपातीबाबत कोणतीही माहिती नाही, असे गॅस सिलिंडर वितरणचे कंपन्यांचे समन्वयक राजवत यांनी सांगितले.
------------
ग्राहकांना सबसिडी बंद केल्याची कोणतीही लेखी माहिती शासनाने पुरवठा विभागाला दिलेली नाही. मात्र, आठ ते नऊ महिन्यांपासून सबसिडी बंद झाल्याचे ग्राहक सांगत आहेत. तसेच सबसिडी बंद करण्याची कारणेही दिलेली नाहीत.
- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
---------------------
मला १५० ते २०० रुपये सिलिंडरचे अनुदान खात्यात जमा होत होते. मात्र, ते सात-आठ महिन्यांपासून मोबाईलवर मेसेज येत नाही. तसेच अनुदान बंद करण्यात येत आहे, याची कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही. तसेच सिलिंडरचे दरही वाढलेले आहेत.
-अशोक गायकवाड, ग्राहक, सुडके मळा
----------
चौकट...
जिल्ह्यातील सिलिंडरधारक -६, ७६,२७१
जिल्ह्यातील गॅस वितरक-१०८
मिळणारी सबसिडी-११० ते २०० रुपये (दराप्रमाणे कमी-जास्त)
---------------
घरपोहोचसाठी २० ते ३० रुपये
एक महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये ५० रुपयांची वाढ झाली आहे. गत महिन्यात गॅस सिलिंडरची किंमत ६५० रुपये होती. सध्या ही किंमत ६५७ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. गोडावूनमध्ये घेतले काय किंवा घरपोहोच सिलिंडर दिले तरी हीच किंमत आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सिलिंडर घरपोहोच देण्यासाठी ग्राहकांकडून २० ते ३० रुपये घेतले जातात. मात्र, त्याला कोणत्याही एजन्सीने अधिकृत परवानगी दिलेली नाही.
----------