पाथर्डी : आपण कोणत्या भागात राहतो, त्या गोष्टीला महत्त्व न देता प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जिल्ह्यातील पहिली फायटर पायलट आयुषी खेडकर हिने केले.
पाथर्डीच्या एकलव्य शिक्षण संस्था परिवार यांच्यातर्फे आयुषी खेडकर हिचा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी संस्कार भवन येथे गुणगौरव करण्यात आला. यावेळी ती बोलत होती.
यावेळी तिने आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांचा ऊहापोह करीत युवकांना पुढील आयुष्यासाठी काही टिप्स दिल्या. यावेळी व्यासपीठावर तिची आजी चंद्रकला खेडकर, वडील डॉ. नितीन, आई डॉ. मनीषा, एकलव्य संस्थेचे सचिव ॲड. प्रताप ढाकणे, संस्थेचे विश्वस्त कांतिलाल गुगळे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, डेप्युटी कमांडर अभिषेक पानसरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे आदी उपस्थित होते.
आयुषी म्हणाली, मेहनत, जिद्द असेल तर सर्व काही शक्य होते. माझ्या यशाचे सर्व श्रेय आजी, आई, वडील तसेच मला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना आहे. आयुष्यात योग्य मार्गदर्शन तसेच चांगले संस्कार मिळाल्यामुळे या यशापर्यंत पोहोचले, असे तिने सांगितले.
बबनराव ढाकणे म्हणाले, सध्या संस्कारमय पिढी घडविणे हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करून युवा पिढी संस्कारी कशी बनेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आयुषीच्या यशामुळे मुलींना निश्चितच स्फूर्ती मिळेल.
प्रताप ढाकणे म्हणाले, पाथर्डी तालुका दुष्काळी असला तरी बुद्धिवादी आहे, हे आज आयुषीच्या रूपाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
प्रास्ताविक डॉ. दीपक देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप गोरे यांनी केले. एस.पी. तुपे यांनी आभार मानले.
---
२१ पाथर्डी खेडकर
आयुषी खेडकर हिचा पाथर्डी येथे ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.