अहमदनगर: कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कुस्त्यांचे फड रंगू लागले आहेत. राज्यातील विविध भागात कुस्त्या होत आहेत. दरम्यान, नुकताच उत्तर महाराष्ट्र केसरी(North Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली. यात अहमदनगरच्या सुदर्शन महादेव कोतकर याने उत्तर महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे.
मागील जवळपास दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील कुस्ती स्पर्धा आता हळुहळू सुरू होत आहेत. दोन वर्षानंतर पाथर्डीमध्ये मोठ्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर कुस्तीगीर परिषद आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील सूमारे 300 मल्ल सहभागी झाले होते.
नाशिकच्या पैलवानावर मातमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या वतीने अहमदनगरच्या पाथर्डी येथे उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अंतिम लढत नगर अहमदनगरच्या सुदर्शन कोतकर आणि नाशिक येथी बाळू बोडखे यांच्यात पार पाडली. यात नगरच्या सुदर्शन कोतकरने बाजी मारली. सुदर्शन कोतकरने नाशिकच्या बाळू बोडखेवर मात करत चांदीची गदा आणि 51 हजारांचे पारितोषीक पटकावले.
असा रंगला कुस्तीचा अंतिम सामनासुदर्शन कोतकर हा 124 किलोचा तर बाळू बोडखे 84 किलोचा पैलवान आहे. या दोघांमधील वजनात मोठा फरक असला तरी, बोडखेने कोतकरला सहजासहजी जिंकू दिले नाही. सुदर्शन कोतकर आणि बाळू बोडखे यांच्यात तब्बल चाळीस मिनिटे कुस्ती रंगली, बोडखेने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तगडी झुंज दिली. या स्पर्धेत तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला आहे.