बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्याची जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वैधमापन पथकाकडून बुधवारी (दि. ३) दुपारी अचानक उपस्थित शेतकऱ्यांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी वे-ब्रीजवरून ऊसाचे वजन करून गेलेल्या वाहनांच्या वजन झालेल्या पावत्या व प्रत्यक्ष दर्शविलेले वजन अचूक आढळल्याचा अहवाल वैधमापन पथकाने दिला आहे.
बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखाना येथे बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या १४ जानेवारी रोजीच्या आदेशानुसार वैधमापन पथकातील सदस्य व समन्वयक यांनी दुपारी दोनच्या सुमारास अचानक भेट देऊन वजनकाट्याची तपासणी केली. यावेळी संबंधित पथकाने उपस्थित शेतकऱ्यांच्या समक्ष वे-ब्रीजवरून ऊसाचे वजन करून गेलेल्या वाहनांपैकी तीन वाहने परत माघारी बोलावली. त्या तीन वाहनांमध्ये ट्रॅक्टर जुगाडांचा समावेश होता. या वाहनांचे प्रत्यक्ष वजनकाट्यावर पुन्हा वजन करण्यात आले. त्यावेळी प्रथम वजन झालेल्या पावत्यांवरील नोंदी व प्रत्यक्षात दर्शविलेले वजन बरोबर आढळून आले. या पथकामध्ये समन्वयक म्हणून सहकारी संस्थांचे प्रथम विशेष लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख, पथक प्रमुख प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार रमेश काथवटे, सदस्य सचिव म्हणून वैधमापनचे निरीक्षक अनुप कुलकर्णी व सदस्य पोलीस नाईक अण्णा पवार आदींचा समावेश होता. या पथकाने पावत्यांप्रमाणे वजन विभागातील दप्तराची तपासणी करून नोंदीची खातरजमा केली. यावेळी दोन्ही नोंदी समान आढळल्या. या तपासणीअंती केदारेश्वर कारखान्याचे वजनकाटे अचूक असल्याचा अहवाल पथकाने कारखाना व्यवस्थापनाकडे दिला.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरड, मुख्य अभियंता प्रवीण काळुसे, केनयार्ड सुपरवायझर किसनराव पोपळे, के. डी. गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार आदींसह शेतकरी व वाहनचालक उपस्थित होते.
फोटो ओळी ०६ केदारेश्वर
बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याच्या वजनकाट्यावर प्रत्यक्ष वजन नोंदींची तपासणी करण्यात आली.