अहमदनगर : तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर उपाध्यापक, पद्वीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बदल्या ऐनवेळी थांबविण्याची वेळ आली होती. हीच परिस्थिती केंद्रप्रमुख्यांच्या बदल्यांच्या दिवशी झाली. ऐनवेळी शिक्षण विभागाला या बदल्यांना स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर करावे लागले. पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचा बदल्याचा विषय गाजत आहे. शिक्षक संघटनांनी यंदा प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी थेट ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. यामुळे राज्याच्या ग्रामविकास विभागाने आतापर्यंत शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात तीन वेगवेगळे परिपत्रक काढलेले आहे. पहिल्या परिपत्रकात गेल्या वर्षी प्रमाणे बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर १५ मेच्या अध्यादेशात आधी पदोन्नती, त्यानंतर समायोजन आणि त्यानंतर यथावकाश शिक्षकांच्या बदल्या करण्याचे सांगण्यात आले. यात सुरुवातीला मुख्याध्यापक, पद्वीधर शिक्षक, आणि उपशिक्षकांचा समावेश होता. २१ मे रोजी ग्रामविकास विभागाच्या सुधारित आदेशात केंद्रप्रमुखांच्या बदल्यांना स्थगिती दिलेली आहे. यात केंद्रप्रमुख हे शिक्षक संवर्गातील असल्याने त्यांचे आधी समायोजन, त्यानंतर पदोन्नती आणि त्यानंतर बदल्या करण्यास सांगण्यात आलेले आहे. जिल्ह्यात २३६ केंद्रप्रमुख आहेत. त्यांना प्रशासकीय बदल्यातून सवलत मिळणार आहे. शिक्षण विभागाने बुधवारपर्यंत या संवर्गातील केंद्रप्रमुखांच्या बदल्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, सरकारच्या सुधारित आदेशामुळे ही प्रक्रिया थांबवावी लागली. आता केवळ शिक्षण विस्तार अधिकारी या संवर्गातील बदल्या होणे बाकी आहेत. यामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायम राहणार आहे. येत्या १६ जूनला प्राथमिक शाळा सुरू होणार असून यापूर्वी बदल्या करता येणार आहेत. अन्यथा वर्षभर बदल्या करण्यास संधी मिळणार नाही. (प्रतिनिधी) यंदाच्या सर्वसाधारण बदल्यात कर्मचार्यांच्या विनंती बदल्या झालेल्या नाहीत. प्रशासन गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आपसी विनंती बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय कोरडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत विभागातील ५६ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पेसा कायदात ९ ग्रामसेवक, समानीकरणात २१ ग्रामसेवक आणि १६ ग्रामसेवकांचे आपसी बदल्या करण्यात आलेल्या आहेत. १० ग्रामविकास अधिकार्यांच्या समानीकरणात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. नगरप्रमाणे राज्यातील केंद्रप्रमुखांच्या बदल्यांना स्थगिती मिळाली आहे. राज्य जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाने अर्जुन साळवे यांच्या नेतृत्वाखाली यासाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची भेट घेत पाठपुरावा केला. आपसी आणि विनंती बदल्या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे. - अशोक घाडगे, कार्याध्यक्ष केंद्रप्रमुख संघ.
केंद्रप्रमुखांच्या बदल्यांना अचानक स्थगिती
By admin | Published: May 23, 2014 1:22 AM