अहमदनगर : शिधापत्रिकाधारकांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड १ किलो साखर व दोन किलो दाळ मिळणार आहे. जिल्ह्यातील सुमारे सहा लाख रेशनकार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत सध्या केवळ अंत्योदय रेशनकार्डधारकांना दरमहा १ किलो साखर २० रूपये दराने दिली जात आहे. जिल्ह्यातील ९३ हजार ७६७ कार्डधारक याचा लाभ घेत आहेत. प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभधारकांना मात्र याचा लाभ होत नव्हता. या कुटुंबाला सध्या प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ एवढेच धान्य मिळते. यंदाच्या दिवाळी सणासाठी मात्र प्राधान्य कुटुंबातील रेशनकार्डधारकांना आॅक्टोबर महिन्यासाठी १ किलो साखर २० रूपये किलो दराने मिळणार आहे. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाने नुकताच याबाबत आदेश दिला आहे.याशिवाय प्रतिकार्ड एक किलो हरभरा दाळ व एक किलो उडिद दाळ किंवा यातील कोणतीही एक दाळ दोन किलो अशा प्रमाणात मिळणार असून त्याचा दर ३५ रूपये किलो असेल. बऱ्याच दिवसांनंतर दिवाळीसाठी शासनाने साखर, दाळीची व्यवस्था केल्याने सामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.