मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यात व देशात एकेकाळी साखरेची आगार अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती. पण आता ही अहमदनगरची साखर धंद्यातील मक्तेदारी मोडीत काढून सोलापूर जिल्हा साखरेचे आगार बनले आहे.आशिया खंडातील व भारतातील पहिला खासगी ब्रॅडी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथे सुरू झाला होता. त्याच अहमदनगर जिल्ह्यात पुढे भारतातील सहकारी तत्वावरील पहिला प्रवरा सहकारी साखर कारखाना सुरू झाला. नंतर दिवंगत अण्णासाहेब शिंदे केंद्रीय शेती मंत्री असताना अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी व खासगी कारखाने सुरू झाले. पुढे हा जिल्हा साखरेचे आगारच बनले. पण आता साखरेचे आगार अशी अहमदनगरची ओळख पुसली गेली आहे. राज्याचे सहकारमंत्री पद भूषविणाऱ्या सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्याने अहमदनगर जिल्ह्यास मागे सारत सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा अशी नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच सोलापूर आता साखरेचे नवे आगार निर्माण झाले आहे.देशमुख यांचे स्वत:चे दोन खासगी कारखाने आहेत. साखर आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात राज्यात १८८ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ कारखान्यांचा समावेश होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील २२, पुणे जिल्ह्यातील १७, सातारा जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा समावेश होता. त्यानंतर मराठवाडा विभागात उस्मानाबादचा पहिला क्रमांक आहे. या जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक १०,‘मांजरा’ गाजविणा-या लातूर जिल्ह्यात ८ कारखाने आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात अवघे २ कारखाने आहेत.खासगीचा बोलबोलासाखरेचे नवे आगार बनलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३१ कारखान्यांमध्ये निम्मे म्हणजे १६ कारखाने खासगी तत्त्वावरील आहेत. तर २२ कारखान्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात ८ कारखाने खासगी आहेत. साखर कारखानदारीवर पकड असणा-या पवारांच्या पुणे जिल्ह्यात ६ कारखाने खासगी आहेत.अहमदनगरचे कारखानेअगस्ती, ज्ञानेश्वर, अशोक, पद्मश्री विखे, गणेश, कोपरगाव, मुळा, संगमनेर, संजीवनी, श्रीगोंदा, वृद्धेश्वर, कुकडी, केदारेश्वर, तनपुरे हे सहकारी कारखाने, तर पियुष, अंबालिका, गंगामाई, प्रसाद, जय श्रीराम, श्री क्रांती शुगर, साईकृपा १ व २, युटेक हे खासगी कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत.
सोलापूर बनले साखरेचे आगार : अहमदनगरची मक्तेदारी मोडली
By मिलिंदकुमार साळवे | Published: October 27, 2018 11:40 AM