शिर्डी: यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव पडले आहेत. आठ पंधरा दिवस कारखानदारांनी साखर विक्री बंद करावी, असा सल्ला सोमवारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच या काळातील साखर विक्रीची चौकशी करण्यात येईल, असे सांगत कारखान्यांनी एफआरपी दिला नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.शिर्डीच्या सरकारी विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. या सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर आपण पूर्ण समाधानी आहात का? याचे उत्तर देताना खोत यांना बरीच कसरत करावी लागली. थेट उत्तर देण्याऐवजी गेल्या पंधरा वर्षाच्या तुलनेत या सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले़ यासाठी अनेक दाखले देतानाच हे सरकार शेतकºयांचेच आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी डॉ़ राजेंद्र पिपाडा, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती दीपक पटारे आदींसह शेतकरी नेत्यांची उपस्थिती होती़शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना खोत यांनी आमचे लबाडाचे आवतनं नाही, आम्ही जेवणच दिल़े पंधरा वर्षे तुमचे सरकार असताना का कर्जमाफी का देऊ शकला नाही?, पंधरा वर्षे ज्यांनी डल्ला मारला ते आता हल्लाबोलच्या माध्यमातून कोल्हेकुई करीत आहेत, या शब्दात त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या आरोपांचा व विरोधकांच्या हल्लाबोल आंदोलनाचा समाचार घेतला़ निवडणुकीच्या तोंडावर वीज देण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीनंतर बिले वसूल केल्याची आठवणही खोत यांनी करून दिली़ २००८ च्या कर्जमाफीच्या तुलनेत चारपट अधिक कर्जमाफी दिल्याचा दावाही त्यांनी केला़दिवंगत यशवंतराव, वसंतदादा यांच्या नंतर शेतकºयांचा कळवळा असलेला मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करीत फडणवीसांनी देशमुख, पवारांची मक्तेदारी मोडीत काढली म्हणून मगरीचे अश्रू सुरू आहेत़ पण फडणवीस आपला कार्यकाल पूर्ण करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक जिंकू, असा विश्वास कृषी राज्यमंत्री खोत यांनी शिर्डीत व्यक्त केला.
साखर विक्रीची चौकशी करणार- सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 8:22 PM