अहमदनगर : राज्यातील साखर कारखानदारीच्या इतिहासाकडे डोकावून पाहिले असता काही रंजक व वास्तव गोष्टी लक्ष वेधून घेतात. सन १९६० मध्ये सहकारी व खासगी तत्वावर राज्यात २३ साखर कारखाने होते. त्यातील तब्बल ११ कारखाने हे एकट्या नगर जिल्ह्यात कार्यरत होते. या ११ कारखान्यांमध्येही १० साखर कारखाने श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यांत केंद्रीत झालेले होते. आजच्या तरुण पिढीला खचितच हा इतिहास माहिती असावा. श्रीरामपूर व कोपरगाव हे दोन तालुके संपूर्ण राज्यात साखर कारखानदारीने वैैभवशाली बनले होते. कारखानदारीबरोबरच आपसूकच कामगार चळवळीचीही ही दोन तालुके मोठी केंद्र बनली. त्यावेळी साखर कामगार, शेती महामंडळ कामगार, शेतमजूर, भूमिहीनांच्या चळवळींनी हा परिसर दणाणून सोडला होता. संपूर्ण राज्याच्या कामगार चळवळीला दिशा देणारे नेतृत्व त्यावेळी याच परिसराने दिले. समाजवादी, लाल निशाण पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच खंडकरी शेतकºयांमध्ये डाव्या विचारांचे नेते प्रामुख्याने त्यावेळी काम करत होते. यात थोर समाजवादी नेते व स्वातंत्र्यसेनानी एस.एम.जोशी, मार्क्सवादी नेत्या गोदूताई परुळेकर, कॉ.श्रीपाद डांगे या नेत्यांनीही अनेकदा या ठिकाणी येऊन आंदोलनांचे वेळप्रसंगी नेतृत्व केले. समाजवादी नेते गंगाधर ओगले, साथी किशोर पवार, कॉ.पी.बी.कडू, कॉ.माधवराव गायकवाड, कॉ.मधुकर कात्रे, कॉ.दत्ता देशमुख, कॉ. भि.र. बावके, भास्करराव गलांडे, सूर्यभान वहाडणे, सारंगधर पवार, ज्ञानदेव थोरात, श्रीधर आदिक ही नेते मंडळी साखर कामगार, शेती महामंडळ कामगार व खंडकरी शेतकरी चळवळीत सक्रिय होती. समाजवादी व डाव्या विचारसरणीच्या चळवळींकडे या कामगारांचे नेतृत्व होते.स्वातंत्र्यपूर्व काळातील नि:स्वार्थी ध्येयवादी समाजवादी नेत्यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर कामगार चळवळींचे नेतृत्व केले. समाजवादी ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यावेळी शेकडो तरुणांनी कामगार चळवळीत आपली आयुष्ये वाहून टाकली. गंगाधर जनार्धन ओगले त्यापैैकीच एक. सन १९१८ चा त्यांचा जन्म. ते मूळचे दहिबाव या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. ते तसे सुखवस्तू कुटुंबातून आले होते. आई-वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठविले. पुण्यात शिक्षण घेत असतानाच ते समाजवादी नेत्यांच्या प्रभावामध्ये आले. त्यावेळी पुणे हे स्वातंत्र्य आंदोलनाचे मोठे केंद्र बनले होते. गंगाधर ओगले हे देखील त्या प्रभावापासून दूर राहू शकले नाहीत. त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. पुढील काळात समाजवादी नेते रावसाहेब पटवर्धन यांनी ओगले यांना श्रीरामपूरला आणले. येथील कामगार चळवळीत ओगले हे सहभाग नोंदवू लागले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सन १९४२ मध्ये चले जाव आंदोलन सुुरू झाल्यानंतर ओगले यांना पुन्हा स्वस्थ बसवेना. त्यांनी पुन्हा श्रीरामपूरहून पुणे गाठत आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी काही काळ त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.समाजवादी नेते रावसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या साखर कामगार युनियनमध्ये गंगाधर ओगले हे सक्रिय झाले. हा तरुण कार्यकर्ता येथे दाखल झाला, तोच मुळी या भागातील साखर कारखान्यातून काम करणाºया कामगारांची घट्ट संघटना बांधण्यासाठी! पुढे ओगले यांनीच स्वत: पुढाकार घेत वालचंदनगर, रावळगाव, लक्ष्मीवाडी (गोदावरी शुगर मिल्स) येथे साखर कामगारांची संघटना स्थापन केली. एव्हाना ओगले हे कामगारांचे लढवय्ये नेते म्हणून पुढे आले होते.टिळकनगर येथील महाराष्ट्र शुगर मिल्स या कारखान्यात सन १९५० मध्ये त्यावेळी कामगारांनी मोठा लढा दिला. थोडाथोडका नव्हे तर तब्बल चार महिने कामगारांचा संप चालला. वेतनवाढ व कामगारांचे हुद्दे हा त्या संपाचा प्रमुख मुद्दा राहिला. पुढे याच आंदोलनादरम्यान ओगले यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांची थेट विसापूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. यानंतर हा संप मोडीत निघेल अशी भीती पसरली गेली. त्यावेळचे मोठे समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनी ओगले यांच्या अनुपस्थितीत संपाचे नेतृत्व केले. कामगारांचे मनोबल त्यामुळे उंचावले गेले. संपात खंड पडला नाही व लढा चालू राहिला.सन १९५० मध्ये मुंबई औद्योगिक संबंध कायदा संमत करण्यात आला. त्यामुळे साखर कामगार चळवळीचे क्षेत्र श्रीरामपूर तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले. श्रीरामपुरात साखर कामगार सभा म्हणून संघटनेची स्थापना झाली तर कोपरगाव तालुक्यात कोपरगाव तालुका साखर कामगार सभा निर्माण झाली. ओगले यांच्यात कमालीची दूरदृष्टी होती. कामगार चळवळ चालवत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरही ती जोडली जावी असा त्यांचा मनोदय होता. यात हेतूने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी (आयएलओ) संघटना जोडण्यात ते यशस्वी ठरले. त्यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्याशी ओगले यांचे घनिष्ठ संबंध होते. प्रवरा कारखान्याच्या उभारणीमध्येही ओगले यांनी पद्मश्रींना सहकार्य केले. साखर कामगार व कारखानदारी यात सलोख्याचे संबंध रहावे, ते फार ताणले जाऊ नये अशी त्यांची धारणा होती. साखर कामगारांची चळवळ चालवत असतानाच कामगारांसाठी रुग्णालय उभारण्याची अभिनव कल्पना त्यांच्या मनाला स्पर्श करून गेली. कामगारांना संघटित करताना आर्थिक लाभांबरोबरच त्यांना इतरही सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत या विचाराने झपाटलेल्या गंगाधररावांच्या मनात कामगारांच्या आरोग्याबद्दलही तितकीच काळजी होती. गरीब, अशिक्षित कामगार रुग्णांना उपचारासाठी जवळपास कोणतेही हॉस्पिटल नाही आणि महागाईमुळे उपचार घेणे परवडणारे नाही, याची जाणीवही गंगाधररावांना होतीच. गोरगरीब रुग्णांना परवडणाºया दरात उपचार मिळायला हवेत या विचारानेच झपाटलेल्या गंगाधररावांनी साखर कामगारांची वर्गणी व देश-विदेशी संस्थांची मदत यातून अथक परिश्रमाने हे रुग्णालय उभे केले.रुग्णालय उभारणीचा विचार त्यांनी त्यावेळी काही मोठ्या कामगार नेत्यांना बोलून दाखविला. अनेकांशी चर्चा करत मतं जाणून घेतली. ओगले हे स्वत: वैैद्यकीय पेशातील नव्हते. तेव्हा रुग्णालय चालविणे ही सोपी बाब नाही. म्हणूनच हा विचार सोडून देण्याचा त्यांना सल्लाही काही नेत्यांनी त्यांना दिला़ मात्र, ओगले यांनी निश्चय पक्का केला होता. नावीन्याची निर्मिती ही वेदनेतूनच होत असते, असे त्यांचे ठाम मत़ त्या मतावर ते कायम राहिले़सन १९६२ मध्ये त्यांनी श्रीरामपूर येथे साखर कामगार रुग्णालय ट्रस्टची स्थापना केली. पद्मश्री विठ्ठलराव विखे हे ट्रस्टचे काही काळ रुग्णालयाचे ेअध्यक्ष राहिले. सन १९६५ मध्ये रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. त्यावेळचे राज्यपाल चेरियन यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही येथे येऊन भेट दिली होती. रुग्णालयाच्या उभारणीकामी ओगले यांना एस. एम. जोशी, डॉ. बाबा आढाव यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कामगारांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पसरले. कामगारांनी उभारलेले आशिया खंडातील हे एकमेव रुग्णालय आहे. त्याकाळी ओगले यांनी परदेश दौरे केले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मदतीने रुग्णालयात सुविधा मिळविण्याकामी मोठी मदत झाली. विदेशातून मशिनरी आणण्यात आल्या. सध्या कामगार नेते अविनाश आपटे व ज्ञानदेव पाटील आहेर यांच्या प्रयत्नातून रुग्णालय रुग्णसेवा करत आहे. अडीच एकर जागेवरील रुग्णालयाचा परिसर एवढा निसर्गरम्य आहे की, रुग्णाला आपल्या यातनांचाही विसर पडतो. कुठल्याही परदेशी संस्थेचे किंवा शासनाचे अनुदान नाही. खर्च चालतो तो कायम कामगारांच्या वर्गणीतूनच! त्यामुळे आर्थिक अडचणी येतात़ तरीही सेवाभावी डॉक्टर्स व इतर कर्मचारी, कामगार अडचणींवर मात करीत हे सेवा कार्य खंडित होऊ देत नाहीत़ विविध प्रकारच्या आजारी रुग्णांसाठी माफक दरात बाह्यरुग्ण तपासणी केंद्र चालविले जाते. दररोज अंदाजे २०० रुग्ण याचा लाभ घेतात.
अविनाश आपटे, (सचिव, साखर कामगार रुग्णालय)