अहमदनगर : शेवगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी शेतक-यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यावर गोळीबार होणे ही काळिमा फासणारी घटना असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी यावेळी अण्णा हजारे यांनी केली.
नेमकी काय घडली घटना?स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांच्या ऊस दर आंदोलनाला बुधवारी (15 नोव्हेंबर ) शेवगाव तालुक्यात हिंसक वळण लागले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर व अॅक्शन गनच्या सहाय्याने प्लास्टिक बुलेटचा मारा केला. गोळीबारात पैठण तालुक्यातील दोन शेतकरी, तर आंदोलकांच्या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले. उद्धव विक्रम मापारे (३४) व नारायण भानुदास दुकळे (४५ दोघे, रा़ तेलवाडी, ता़ पैठण) या जखमी शेतक-यांवर नगरला उपचार सुरू आहेत़ उद्धव यांच्या छातीत उजव्या बाजूला छर्रा घुसला आहे.
नगर व औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरील गंगामाई खासगी कारखान्याने भाव जाहीर केला नव्हता. ३,१०० रुपये भावासाठी खानापूर, घोटण परिसरात शेतक-यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरीही त्यात सहभागी होते. आंदोलकांनी वाहने अडविल्याने चार किमीपर्यंत रांगा लागल्या. पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचाही वापर केला. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड व जाळपोळ केल्याने पोलिसांना प्लॅस्टिक गन वापरावी लागली, असे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. पैठणमध्येही पोलिसांनी काहींची धरपकड केली.
सोलापुरात रास्ता रोको सोलापूरमध्ये सांगोल्यात ऊसाच्या दरावरून आंदोलकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले. मंगळवेढ्यात रास्ता रोको आंदोलन केले.
बैठकीनंतर शांत झाले शेतकरीघटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे शेवगावमध्ये आले. अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, प्रांताधिकारी विक्रम बांदल व शेतकरी नेत्यांमध्ये सायंकाळी बैठक झाली. त्यानंतर, गंगामाई कारखान्याने २,५२५ रुपये भाव जाहीर केला. बैठकीनंतर आंदोलन स्थगित केल्याचे तुपकर यांनी सांगितले.