राहुरी : ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, अशा विविध घोषणा देत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी १२.३० वाजता रस्त्यावर उतरले. गुहा येथे नगर-मनमाड रोडवर उसाची वाहने अडवून ३४०० रुपये उसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन सुरु केले.स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, सतिष पवार, अरुण डौले, भागिरथ पवार, राहूल कर्पे, दिनेश वराळे, अनिल इंगळे, आसिफ पटेल, राजेंद्र शिंदे, तुषार शिंदे, विजय तोडमल, संदीप शिरसाठ, प्रमोद पवार, रामकृष्ण जगताप, दिलावर पठाण आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. कारखान्याकडे जाणाºया उसाच्या गाड्या आंदोलकांनी अडविल्या. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा, अशा घोषणा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले. या मार्गावरुन जाणारी सर्व उसाची वाहने अडविण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्याकडेने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत. अद्याप आंदोलनस्थळी प्रशासनाचे कोणीही फिरकले नाही. ३४०० रुपये उसाचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, रास्ता रोको आंदोलनात पुन्हा घुमला राहुरीकरांचा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:03 PM