पठारभागात ऊसतोडणी सुरु असून त्यामुळे ऊसात राहणारे बिबटे शेताबाहेर पडत आहेत. बिबट्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. परसराम धर्माजी सोनवणे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेळकेवाडी येथील युवराज काशिनाथ वायाळ यांच्या गट नंबर ३९ मध्ये ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी हे मजूर ऊस तोडत असताना त्याचवेळी ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने परसराम धर्माजी सोनवणे या ऊसतोड मजूराला पंजा मारला. यात सोनवणे हे किरकोळ जखमी झाले. आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. त्यांना उपचारासाठी घारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावणार असल्याचे घारगावचे वनपरिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी सांगितले.