अहमदनगर : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) ‘बालविकास’ या विषयावर तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. विविध देशांमधील ४४ सदस्यांसोबत काम करण्याचा मान डॉ.तांबोळी यांना यानिमित्ताने मिळाला आहे.
मुंबई येथे गत आठवड्यात राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेची बैठक झाली. या बैठकीत भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने ‘लवकर वयातील बालविकास’ या विषयावरील टास्क फोर्सची निवड करण्यात आली. ही ४४ सदस्यांची समिती असणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातील तीन सदस्यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करताना ‘लवकर बालविकास करण्यासाठी काळजी कशी घ्यावी’ या कार्यक्रमांतर्गत डॉक्टरांना पदवीपूर्व व पदव्युत्तर बालविकास या विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विषयातील त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. तसेच तीन महिन्यांच्या मुदतीत अहवाल सादर केला जाणार आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमातही डॉ. तांबोळी यांचा एका विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
बालविकासची मार्गदर्शक तत्त्वे, सूचना, तपासणी कशी करावी ? उपचार काय करावेत? याबाबतचा अभ्यासक्रम हा टास्क फोर्स तयार करणार आहे. या अभ्यासक्रमामुळे जन्मापासून मुलांच्या विकासाकडे पालकांनी कसे लक्ष द्यावे, याबाबत बालरोगतज्ज्ञ हे पालकांना मार्गदर्शन करू शकणार आहेत.
--
फोटो-२१ तांबोळी