श्रीरामपूर : तालुक्यातील मालुंजा येथील तरुण शेतकरी जालिंदर नानासाहेब बडाख (वय ३९) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत्यूप्रकरणी तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. तरुण शेतकरी जालिंदर हा अल्पभूधारक असून मालुंजा-भेर्डापूर रस्त्यावर त्याची वस्ती आहे. त्याने खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. मात्र खासगी फायनान्स कंपनीने दोन वर्षांपूर्वी ट्रॅक्टर ताब्यात घेतला. ट्रॅक्टर ओढून नेला तरीही कर्जाचा बोजा मात्र काही प्रमाणात कायम राहिला. सेवा संस्थेचेही काही कर्ज होते. या विवंचनेमुळे जालिंदर याची गेल्या काही महिन्यापासून शेती पडिक पडली होती. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.
सोमवारी पहाटे घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. शेजारी आत्महत्येचे वृत्त समजताच घटनास्थळी गर्दी जमली. तालुका पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सोमवारी दुपारनंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बडाख याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भावजयी, पुतणे, चुलते, चुलती असा परिवार आहे.