आश्वी : सोड खरेदीने (गहाण खत) दिलेल्या जमिनीचे पैसे दिल्यानंतरही जमीन परत देत नसल्याने शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे घडली. गंगाधर भिकाजी जोशी असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे.गंगाधर जोशी यांच्या मुलाने आश्वी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. गावातील गट नंबर 66 मधील दोन एकर जमिनीपैकी संदिप गंगाधर जोशी याच्या नावावरील एक एकर जमीन 2003 साली गहाण खताने एक लाख रुपये व व्याजाने दीड लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपयांना गावातील भास्कर भीमा जोशी यांना दिली होती. 2016 साली महात्मा गांधी तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष अण्णासाहेब गेणुजी जोशी, सुरेश जोरी, अशोक जोशी यांच्या समक्ष व्याजासह चार लाख चाळीस हजार रुपये रोख दिले. त्यानंतर वेळो वेळी जमीन परत देण्याची मागणी केल्यानंतरही जमीन परत न करता गंगाधर जोशी यांना भास्कर जोशी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत असत. या त्रासाला कंटाळून गंगाधर जोशी यांनी आश्वी पोलीस स्टेशन ला दोन दिवसांपुर्वी आश्वी पोलीस स्टेशन तक्रार अर्ज दिला दिला होता.त्रासाला कंटाळून गंगाधर जोशी यांनी विष पिऊन आत्महत्या केली. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.