काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा उद्देश - सुजात आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:27 AM2019-08-12T05:27:08+5:302019-08-12T05:27:32+5:30
काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा आमचा उद्देश आहे. आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणायचे आहे आणि वंचितांना त्यांचे न्यायहक्क मिळवून द्यायचे आहेत
- दिलीप चोखर
राहाता (जि. अहमदनगर) - काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा आमचा उद्देश आहे. आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणायचे आहे आणि वंचितांना त्यांचे न्यायहक्क मिळवून द्यायचे आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राहाता येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या युवा परिषदेपूर्वी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, मी वंचित बहुजन आघाडीचा केवळ कार्यकर्ता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा समजावून घेणे, युवकांचे संघटन बांधण्याचे काम करीत आहे. काँग्रेसशी युती होईल की नाही हे सांगणे आता कठीण आहे. लोकसभेच्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची ‘बी’ टीम आहे, असा प्रचार केला होता. आता काँग्रेसने पहिले हे सिद्ध करावे की वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम आहे किंवा नाही. त्यांनी राजकीय हतलबतेने आरोप केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्या नेत्यांनी भाजपा, शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्यांच्याकडे निष्ठा मुळीच नव्हती. आमच्याकडेही औरंगाबाद, सोलापूर, सांगली, विदर्भातील नगरसेवकांचे इनकमिंग सुरू झाले आहे. १२ विद्यमान आमदारांनी वंचित आघाडीकडे मुलाखती दिल्या आहेत. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात निश्चित गडबड आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर वंचितने राज्यातील ४८ लोकसभा उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्र व पुराव्यासह न्यायालयात लढाई सुरू केली आहे.