अहमदनगर : केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी रविवारी (२ आॅगस्ट) येथे केले.
विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित आॅनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खासदार विखे बोलत होते. डॉ. सुजय विखे यांनी जिल्हाधिका-यांच्या कारभारावर यावेळी टीका केली.
नगर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. परंतु प्रशासनाकडून कुठलीही तयारी केली गेली नाही. केंद्र शासनाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी चार कोटी रुपये नवीन कर्मचा-यांची भरती करण्यासाठी आहे. परंतु अद्याप एकाही कर्मचा-यांची भरती केली गेली नाही. मी स्वत: लक्ष घातले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आयसीयू सेंटर उभे राहिले. त्याचबरोबर महापालिकेशी करार करून कोवीड चाचणी सेंटर सुरू केले. त्यामुळे हा आकडा वाढला आहे, असे ते म्हणाले.
नाशिक, पुणे, मालेगाव आदी शहरांमध्ये जाऊन त्या काळात अधिकाधिक कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे तेथील पीक पिरेड आता संपला आहे. तेथील रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. नगर जिल्ह्यात मात्र लॉकडाऊन शिथील केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही. हा मुद्दा केंद्रीय मेडिकल समितीच्या वैद्यकीय समितीच्या बैठकीत मी मांडणार आहे, असेही खासदार विखे यांनी सांगितले.