अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी ११३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला, तर ८७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८६० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटिजन चाचणीत २० रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (३३), अकोले (६), कर्जत (२), कोपरगाव (११), नगर ग्रामीण (१५), नेवासा (२), पारनेर( १६), पाथर्डी (७), राहाता (७), राहुरी (१), शेवगाव (१), श्रीगोंदा (४), संगमनेर (३), जिल्हा बाहेरील (४) अशा रुग्णांचा समावेश आहे.
--------------
दिल्ली गेट परिसर खड्डेमय
अहमदनगर : दिल्लीगेट ते बागरोजा हडको ते नेप्ती चौक आणि दिल्ली गेट ते नीलक्रांती चौकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. तसेच धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान बागरोजा हडको परिसरात रस्त्याचे व ड्रेनेजचे काम सुरू असल्याने तेथेही वाहतुकीची कोंडी होते.
--------------
कुष्ठधाम रस्त्यावरील फलक काढण्याची मागणी
अहमदनगर : सावेडी परिसरातील आकाशवाणी ते कुष्ठधाम ते भिस्तबाग रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्यावरील आकाशवाणी परिसर व गुलमोहर रोडच्या कॉर्नरवरील कमानी काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावरील झाडे तोडण्यात आली. तसेच अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र, कमानी हटविण्यात न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित एजन्सीला महापालिकेने पत्र दिले असून याबाबत अद्याप कारवाई झाली नाही.
----------------
उद्यान उघडण्याची मागणी
अहमदनगर : शहरातील महालक्ष्मी उद्यान, सिद्धीबाग, गंगा उद्यान सुरू करण्याची मागणी सावेडी परिसरातील सुप्रभात ग्रुपने पत्रकान्वये केली आहे. उद्यानामध्ये सामाजिक अंतर ठेवून व विशिष्ट संख्या निश्चित करून उद्यानात प्रवेश दिला तर कोरोनाचा धोका राहणार नाही. तसेच दिवसातून दोन वेळा उद्याने सॉनिटाइझ करावीत, अशीही मागणी पत्रकात केली आहे.