सुधीर लंके
राजकारण ही सभ्यपणे करायची गोष्ट आहे. हे सुसंस्कृत लोकांचे क्षेत्र आहे, यावर नगरच्या काही नेत्यांचा बहुधा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पातळी सोडून विरोधकांवर टीका करण्याचे प्रकार दिसू लागले आहेत. श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणात जे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत त्याने तर अत्यंत खालची पातळी गाठली. सुसंस्कृत लोकांनी किंवा महिला वर्गाने राजकारण करावे की नाही? हा गंभीर प्रश्न श्रीगोंद्याच्या नेत्यांनी निर्माण केला आहे. नगर जिल्ह्यासाठीही ही भूषणावह बाब नाही.ही निवडणूक पालिकेची आहे. राज्यकर्ते म्हणून आम्ही शहरात काय सुविधा दिल्या किंवा काय सुविधा देणार आहोत, याचा अजेंडा नेत्यांनी या निवडणुकीत मांडणे आवश्यक आहे. आलेल्या निधीचा जमाखर्चही त्यांनी जनतेला द्यावा. पण ते राहिले बाजूला. उमेदवारांच्या वैैयक्तिक आयुष्यात डोकावण्यापर्यंत नेते खाली घसरले आहेत. त्याची सुरुवात बबनराव पाचपुते यांनी केली. ‘मी विकासकामांसाठी मुंबईला जायचो. तेव्हा काही नेतेमंडळी मागे पनवेलला थांबायचे’ असे विधान त्यांनी केले. यातून पाचपुते यांना काय ध्वनीत करावयाचे आहे, हे जनतेला समजते. पाचपुते हे माजी मंत्री आहेत. स्वत:ला वारकरी म्हणतात. अशावेळी त्यांनी भान राखून बोलले पाहिजे. राजकारणात चारित्र्याला महत्त्व आहेच. पण याचा अर्थ कुणाच्याही चारित्र्याचा पुरावा न देता जाहीर पंचनामा करायचा? हे राज्यघटनेला मंजूर नाही. पाचपुते यांचे वैयक्तिक चारित्र्य त्यांना प्राणप्रिय आहे. तेवढेच विरोधकांनाही स्वत:चे चारित्र्य आहे, हे पाचपुते यांनी लक्षात घ्यायला हवे. कुणाची पनवेलवारी त्यांच्या लक्षात आली होती तर नेता म्हणून त्यांनी त्याचवेळी दखल घेणे आवश्यक होते.पाचपुते यांच्यापेक्षाही राष्टÑवादीचे आमदार राहुल जगताप यांनी तर कहर केला. श्रीगोंद्यात काय ‘बाजीराव-मस्तानी’चा चित्रपट सुरू करायचा आहे का? असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत केला. खरेतर पत्रकारांनीच या वाक्याचा अर्थ काय हे त्यांना विचारायला हवे होते. नेत्यांनी काहीही बोलायचे व ते पत्रकारांनी निव्वळ प्रसिद्ध करायचे ही माध्यमांचीही भूमिका नाही. पत्रकारांनीही मुळाशी जाणे अपेक्षित आहे. पत्रकार जेव्हा मुळाशी जातील तेव्हा अशी निराधार विधाने होणार नाहीत.जगताप यांच्या या विधानाचे खूप गंभीर अर्थ निघतात. ज्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारी करत आहेत व इतरही अनेक जागांवर महिला उमेदवारी करत आहेत, तेथे नेत्यांनी प्रचारात किती जबाबदारीने बोलले व वागले पाहिजे. पण, नेत्यांनी ते ताळतंत्र गमावले आहे. किमान सभ्यताही संपत चालली आहे. जगताप यांना नेमके काय म्हणायचे आहे, याचा त्यांनी नीट खुलासा करायला हवा. राष्ट्रवादीनेही याचे उत्तर द्यायला हवे.आपल्या देशात महिलांचा सतत सन्मान केला गेला आहे. प्रतिभाताई पाटील यांची राष्टÑपतीपदासाठी जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा शिवसेनेसह सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा दिला. एक महिला राष्टÑपती होत आहे, म्हणून आमचा पाठिंबा आहे, अशी उदात्त भूमिका शिवसेनेने घेतली होती. राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी सातत्याने महिलांच्या सन्मानाची भाषा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना आरक्षण देण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. आपली मुलगी सुप्रिया यांना त्यांनी राजकारणात आणले. महिलांनी राजकारणात यावे, अशी हाक हा पक्ष सातत्याने देतो. त्यांच्याच पक्षाचे आमदार मात्र राजकारणात ‘बाजीराव-मस्तानी’ची भाषा करतात याला काय म्हणायचे? या उपमा ते कुणाला देत आहेत? ते कुणाला हिणवू पाहत आहेत.विशेष म्हणजे जगताप यांना आपल्या या विधानाचे काहीही शल्य वाटलेले नाही. ‘ज्यांना जिव्हारी लागायचे ते लागेल’ अशी पुष्टी देत त्यांनी आपल्या विधानाचे उलट एकप्रकारे समर्थन केले. ही सत्तेची मस्ती आहे. महिलांना कमी लेखणारी एक पुरुषी मानसिकताही यात डोकावते. राजकारणातील महिलांच्या अथवा पुरुषांच्याही चारित्र्याबाबत शंका घेणारी विधाने जेव्हा केली जातात, तेव्हा या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीनेही जाब विचारणे अपेक्षित आहे. परंतु पक्षांची जिल्हा कार्यकारिणी ही त्यांच्या पक्षांच्या आमदारांना कायमच शरण गेलेली असते. आमदार या कार्यकारिणीपेक्षा सुप्रिम होऊन बसले आहेत. जिल्हाध्यक्षपदे ही आमदारांच्या घरगड्यासारखी झाली आहेत. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा आपल्या आमदारांवर अंकुश राहिलेला नाही. राज्याच्या कार्यकारिणीचाच नाही तेव्हा जिल्ह्याची काय बात.श्रीगोंद्यात हा सर्व धुमाकूळ सुरु असताना इतर नेतेही तमाशा पाहत आहेत. राजेंद्र नागवडे हे तेथील मोठे प्रस्थ. अनुराधा नागवडे या स्वत: जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण समितीच्या सभापती आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शालिनी विखे यांच्या रुपाने एक महिलाच आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राजश्री घुले आहेत. या महिला पदाधिकाऱ्यांनीही श्रीगोंद्याच्या नेत्यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे विचारले पाहिजे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या पक्षातील महिलांनीच जगताप यांच्या विधानाला आक्षेप घेत हे महिलांचे चारित्र्यहनन असल्याचे म्हटले आहे. असे असताना शिंदे यांनीही या प्रकरणावर अद्याप काहीही भाष्य केले नाही. या पक्षाच्या महिला आमदारही याबाबत मौन बाळगून आहेत. पाचपुतेही काहीच बोलत नाहीत.कुणालाही दुखवायचे नसले की मौन धारण करायचे ही एक नवी निती राजकारणात आली आहे. यामुळे भलेभले नेतेही अशा गंभीर प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. त्याऊलट ‘राजकारणात हे चालूच राहते’असे समर्थन अशा प्रकारांबाबत केले जाते. त्यामुळे खालच्या नेत्यांचे फावते.‘पनवेल’ आणि ‘बाजीराव-मस्तानी’ म्हणजे काय? हे श्रीगोंद्यातील मतदारांनीच आपल्या नेत्यांना विचारले पाहिजे. जनता विचारत नाही तोवर नेते अशी बेफाम विधाने करत राहतील. जिल्ह्यातील दिवंगत गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे हे नेहमी म्हणायचे. ‘आता राजकारण हे साधूंचे नव्हे तर संधीसाधूंचे’ आहे. अशी विधाने हा संधीसाधूपणाच आहे. राजकारणात सुधारणा व्हावी, या उद्देशाने ही विधाने केली गेलेली नाहीत. राजकारण सुधारावे असे नेत्यांना अपेक्षित असते तर ‘कसे बोलावे, कसे वागावे’ याबाबत नेत्यांनी कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे घेतली असती. आता असे शिक्षणच थांबले आहे.सुप्रिया सुळे काय करणार?राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी आरोप करताना ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाची उपमा नेमकी कोणासाठी वापरली? अशी उपमा वापरणाºया आ. जगताप यांच्याबाबत काय भूमिका घेणार? याबाबत ‘लोकमत’ने संपर्क साधला असता खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे काय प्रकरण आहे, ते माहिती नाही. माझ्याकडे याबाबतची तक्रारही प्राप्त झाली नाही. या प्रकरणाची माहिती घेऊ. दरम्यान या प्रकरणी खा. सुळे या आ. जगताप यांच्याबाबत काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.