भाऊसाहेब येवलेराहुरी : नर्मदा परिक्रमा म्हटले की त्यामध्ये मोठ्या माणसांचा समावेश ठरलेला असतो़ मात्र श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़राहुरी) येथील दोन वर्षाचा चिमुरडा बालक माता-पित्याबरोबर नर्मदा परिक्रमा करतो आहे़ दररोज पाच किलोमीटर तो पायी चालतो़ उर्वरीत प्रवास माता-पित्याने बनवलेल्या झोळीतून करतो आहे़ माता-पिता अन चिमुरडा थकला की त्याच्यासाठी कापडाची झोळी बांधून त्यातून परिक्रमा सुरू होते़ या तिघांचा प्रवास बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसतो़ नवनाथ आहेर (वय ३४) व सीमा आहेर (वय ३०) हे पती-पत्नी वारकरी सांप्रदायाचे आहेत़ त्यांच्यासमवेत दोन वर्षाचा राघवही नर्मदा परिक्रमात सहभागी झाला आहे़ नर्मदाच्या काठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत़ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राज्यातील नर्मदा नदीच्या तिरावरून ही परिक्रमा सुरू आहे़ मला तालू द्याना असा बालहट्ट राघव धरतो़ नाईलाजाने राघवला माता-पिता संधी देत आहेत.कधी काठीला बांधलेल्या झोळीतून तर कधी लुटूलुटू पायी राघव दौडत आहे़ माता-पित्याच्या मदतीने व लुटूलुटू चालण्याचे दृश्य पाहून अनेक जण आस्थेने चौकशीही करतात़ वेळप्रसंगी सीमा व नवनाथ हे राघवला खांद्यावर घेऊनही परिक्रमा करीत असतात़ परिक्रमाची ही चाललेली कसरत अनेकांना भावते़नर्मदा परिक्रमाचा तब्बल ३२ किलोमीटरचा प्रवास आहे़ राघवला घेऊन सीमा व नवनाथ आहेर हे दररोज २५ ते ३० किलोमीटरचा पल्ला सहज पारही करतात़ नवनाथ महाराज यांनी यापूर्वी चार परिक्रमा वाहनाद्वारे के ली आहे़ यंदा मात्र पायी परिक्रमाचा संकल्प सुरू आहे़ परिक्रमा करताना राघवची कुठलीही तक्रार नाही़ माता-पित्याला कोणताही प्रकारचा त्रासही नाही़ त्यामुळे वरवर कष्टमय वाटणारी नर्मदा परिक्रमा आल्हाददायक ठरत आहे़ राघवचे कौतुक म्हणून ठिकठिकाणी सत्कारही केला जातो़ नवनाथ महाराज आहेर यांची गुरू महाराजांवर अपार श्रध्दा आहे़ त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून नर्मदा मातेला परिक्रमा करण्याचा संकल्प केला आहे़ परिक्रमा करणे हे कठीण काम मानले जाते़ मात्र गुरूच्या श्रध्देपोटी आहेर महाराज यांची निरविघ्न परिक्रमा सुरू आहे़नर्मदा परिक्रमा करताना अनेकांशी संपर्क येतो़ नर्मदा नदीच्या काठावर अनेक माणसे गरीब वर्गातील आहेत़ गरीब असले तरी त्यांच्यामध्ये मनाचा मोठेपणा आहे़ नर्मदा मातेच्या परिसरात राहणारी माणसे आहेर परिवाराला भोजन, चहा, नाष्टा व निवासाची व्यवस्था करतात़ परिक्रमा करताना विविध ठिकाणी आश्रमात रहावे लागते.
वर्षभर महाराष्ट्रात प्रवचन कीर्तन करीत असतो़ मिळालेल्या रकमेतील २५ टक्के रक्कम नर्मदा माता परिक्रमासाठी खर्च करतो़ कठपोर ते मिठीतलाई असा चार तासांचा प्रवास बोटीद्वारे केला जातो़ शुलपाणी जंगलाचे सात डोंगर पार करावे लागतात़ लक्कडकोट जंगलातील श्वापदांची भीती यावर मात करीत परिक्रमा पार पाडली जात आहे- -नवनाथ आहेर