नानासाहेब जठारविसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहाने २०१८-१९ मध्ये शेती व शेती पूरक व्यवसायाद्वारे ६६ लाख ५३ हजार ३७७ रूपयांची कमाई करून शेती उत्पन्नात पश्चिम विभागात पहिला तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला.विसापूर कारागृहात सध्या १२४ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शना खाली तुरूंगाधिकारी बाळकृष्ण जासूद, राजेंद्र पवार व कर्मचारी कैद्यांकडून शेती कामे करून घेतात. कारागृहाची १२९ एकर शेती आहे. त्या पैकी काही क्षेत्रावर कारागृह इमारत व कर्मचारी वसाहत आहे. शिल्लक सुमारे शंभर एकर शेतीमध्ये ऊस, ज्वारी, गहू, बाजरी, तूर व कडधान्य ही पिके घेतली जातात. सुमारे पन्नास ते साठ एकरात वांगी, टोमॅटो, कारली, दोडका, पडवळ,कोबी,फ्लॉवर,दुधी व डांगर भोपळा या सारखा भाजीपाला पिकवला जातो.हा पिकवलेला भाजीपाला शासकीय दराने येरवडा, ठाणे,नाशिक, मुंबई मधील भायखळा व आर्थररोड या कारागृहांना पुरविला जातो. या सर्व शेती उत्पादनातून कारागृहाला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ६६ लाख ५३ हजार ३७७ रूपये उत्पन्न मिळाले. २९ लाख ६० हजार ७४२ रुपये खर्च वजा जाता कारागृहाला ३६ लाख ९२ हजार ६३५ रूपये निव्वळ नफा झाला. हे शेती उत्पादन कारागृह विभागात पश्चिम विभागात प्रथम, तर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे ठरले. मात्र खर्च वजा जाता उत्पन्नात विसापूर कारागृह राज्यात पहिले ठरले आहे.राज्यात उत्पादनात प्रथम आलेल्या पैठणच्या खुल्या कारागृहाचे उत्पादन ७५ लाख २५ हजार ७८१ रूपये आहे. मात्र त्यांचा खर्च ५० लाख ७९ हजार ७७८ रूपये झाला आहे. त्यामुळे त्यांचे निव्वळ उत्पन्न २४ लाख ४६ हजार ३ एवढे असून ते विसापूरपेक्षा कमी आहे.कारागृहाकडे शेळी पालन व कुक्कुटपालन आहे. पशुधनापासुन मिळणाºया खताचा वापर शेतात केला जात असल्याने रासायनिक खते कमी प्रमाणात खरेदी करावी लागतात. या बाबींमुळे विसापूर कारागृहाला उत्पादन खर्च कमी येत आहे.
संडे Motivation : विसापूर कारागृह शेती उत्पन्नात राज्यात द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:37 PM