अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात लाट आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे राष्टÑवादी नगरला इतिहास घडवेल. नगरचा निकाल हा धक्कादायक असेल, असे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेलात?मोदी सरकारने दिलेली आश्वासने व नंतर केलेली फसवणूक यावरच आम्ही प्रचारात भर दिला आहे. शेतकरी, कामगार, नोकरदार, युवक, महिला, दलित, मुुस्लिम हे सर्व घटक अडचणीत आहेत. लोक महागाईने त्रस्त आहेत. हेच आम्ही प्रचारात जनतेसमोर मांडले.
तुमची प्रचाराची पद्धत काय होती?आम्ही काही गावांत मोठ्या सभा घेतल्या. त्यानंतर गावोगावी व घरोघर जाऊन प्रचार केला. आमच्या उमेदवाराकडे प्रचारासाठी कमी वेळ होता. असे असताना दिवसरात्र एक करुन संग्राम जगताप हे ग्रामीण भागात खेडोपाडी पोहोचले. त्यांचा संपर्क चांगला आहे.
कॉंग्रेस प्रचारात सक्रीय होती का?राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातील सर्व कॉंग्रेस आमच्यासोबत एकदिलाने होती. आमच्यापेक्षाही त्यांनी ताकद लावून प्रचार केला.राधाकृष्ण विखे प्रचारात नव्हते. आम्ही त्याबाबत कॉंग्रेसकडे तक्रार केली आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांना विचारणा करायला हवी. विखेंनी आघाडीचा धर्म तोडला. त्यांनी भाजपला साथ दिली. तसे करायचे होते तर त्यांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. पण तसेही केले नाही. त्यांच्यासोबत आता आम्ही जिल्हा परिषदेच्या सत्तेत राहणार नाहीत. विखेंनी जरी नगरला आघाडी धर्म पाळला नसला तरी शिर्डीत आम्ही कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहोत.
निवडणुकीचे काय चित्र राहील?निकाल पहा. राष्टÑवादीच विजयी होईल. प्रचारात एक सुप्त लाट आम्हाला दिसली आहे.सर्वच तालुक्यात आम्ही भक्कमनगर मतदारसंघात राष्टÑवादीची ताकद आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही जाहीर प्रचार न करताही १८ नगरसेवक निवडून आले. भाजपने जिल्हा परिषद व नगर महापालिका या दोन्ही निवडणुकांत ‘फोर्टी प्लस’चा नारा दिला होता. त्याचे काय झाले हे जिल्ह्याने पाहिले आहे. १४ च्या वर जागा त्यांना महापालिकेत मिळू शकल्या नाहीत. याहीवेळी तो चमत्कार घडेल. नगर व श्रीगोंद्यात आमचा आमदार आहे. पारनेर, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डीतही आमची चांगली बांधणी आहे. शेतकरी, व्यापारी, युवक, महिला हे सर्व घटक आमच्या सोबत आहेत.राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांच्या रुपाने तरुण चेहरा दिला आहे. त्यांच्यात नम्रता आहे. तरुणांचे जाळे त्यांच्या पाठिशी आहे. ते चमत्कार घडवतील. . नगरला भाजपच्या उमेदवारांनी स्वत: मोदी व भाजप किती वाईट आहे हे सांगितलेले आहे. आमचा बहुतांश प्रचार त्यांनीच केलेला होता. निवडणुकीत मोदींच्या विरोधात लाट आहे. स्वत: भाजपचे कार्यकर्ते देखील खासगीत ही बाब मान्य करतात. -राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष