चंद्रकांत शेळकेसध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे. याचा थेट परिणाम पाण्याची पातळी खालावून दुष्काळावर होत आहे. त्यामुळे या वाळूउपशाचे दुष्परिणाम, उपाय, तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यासंदर्भात हवामानतज्ज्ञ व पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. बी. एन. शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.प्रश्न : वाळूउपशामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो?उत्तर : वाळूउपसा करणे गैर नाही. परंतु तो प्रमाणात हवा. पुराचे पाणी नदीपात्रातून बाहेर जाऊ नये म्हणून आवश्यक वाळूउपसा करून नदीची खोली प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणारे अतिप्रमाणातील पाणी सहज पुढे जाण्यास मदत होते. परंतु वाळूचा अतिउपसा पर्यावरणाला घातक आहे. वाळूमध्ये नदीपात्रातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे आवश्यक वाळू पात्रात असेल तर पावसाळ्यात येणारे पाणी वाळूतून परिसरातील विहिरी, बंधाऱ्यांत साठते. तसेच जमिनीखालची पाणीपातळी राखून ठेवली जाते. नदीत वाळूच नसेल तर येणारे पाणी सरळ पुढे निघून जाईल. परिणामी नदीपात्राशेजारील परिसरातील पाणी पातळी खालावेल. नगर जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड, भीमा अशा मोठ्या नद्या वाहतात. त्यातील वाळूमुळे परिसरातील पाणीपातळी नेहमी इतर भागापेक्षा जास्तच असते. परंतु जर अतिवाळूउपसा झाला तर या भागातील पाणी इतर भागापेक्षा एकदम कमी होते.प्रश्न : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो का?उत्तर : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो. वाळूउपशामुळे नदीपात्रातील ईको सिस्टीम विस्कळीत होते. उदा. नदीतील मासे, खेकडे, साप वाळूउपशातून उद्ध्वस्त होतात. त्यामुळे त्यांची अन्नसाखळी तुटते. हे किटक किंवा प्राणी नष्ट झाल्याने त्याचा परिणाम परिसरातील पिकांवर रोगराई पडण्यावर होतो. त्यामुळे हे प्राणी जगले पाहिजेत. त्याचा शेतकºयांना फायदाच आहे.प्रश्न : वाळूला काही पर्याय आहे का?उत्तर : वाळूचा उपयोग बांधकामासाठीच होतो. सध्या ग्रामीण भागात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू वापरली जाते. परंतु शहरी भागात बांधकामासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. वाळूऐवजी खडकापासून तयार केलेली भुकटी (क्रश सँड) बांधकामात वापरली जाते. याशिवाय बगॅसपासून तयार केलेले ब्लॉकही वापरात आहेत. त्यामुळे भिंती उष्णतारोधक बनतात आणि त्याचे वजनही कमी असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात लाकूडतोड व्हायची व या लाकडाचा वापर जळणासाठी व्हायचा. परंतु गेल्या दहा वर्षांत घरगुती गॅसचे प्रमाण वाढल्याने सध्या लाकूडतोड आपोआपच आटोक्यात आली आहे. तसे वाळूचे हे पर्याय आणखी मोठ्या प्रमाणात वापरले गेले तर वाळूउपसाही आपसूकच आटोक्यात येईल.प्रश्न : भारताबाहेरही वाळूचा उपयोग होतो का?उत्तर : भारताबाहेर वाळूचा उपयोग होतो, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी आहे. जपानसारख्या देशात तर वाळू वापरलीच जात नाही. तेथे भूकंपाचे प्रमाण जास्त आहे. वाळूच्या भिंती जड असतात. त्यामुळे जपान किंवा इतर भूकंपप्रवण देशांमध्ये बांधकामात वाळूऐवजी स्टील किंवा लाकडाच्या लगद्यापासून तयार केलेल्या विटांचा वापर करतात.