सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखाने ही कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. रूग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी लागणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत देण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यातील पहिली १० उपकरणे विस्तारित सुपा एमआयडीसीतील कॅरिअर मायडिया कारखान्याने वितरित केले आहेत.
उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी एमआयडीसीमधील उद्योजकांना कोरोना काळात मदतीचे आवाहन केले होते. सुपा इंडस्ट्रीयालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग धूत यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यांना प्रतिसाद देत कॅरिअर मायडियाचे उपाध्यक्ष (व्हीपी) गिरीश चंदर, व्यवस्थापक पंकज यादव यांनी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रशासनाकडे दिले आहेत. आम इंडिया कंपनीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागविले आहेत, असे व्यवस्थापक संदीप गोखले यांनी सांगितले. पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या जाफा कारखान्याने ही हे उपकरण व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लागणारे मास्क देण्याबाबत कार्यवाही सुरू केल्याची माहिती व्यवस्थापक भागवत चव्हाण व नेमीनाथ सुतार यांनी दिली.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सुप्यातील कारखान्यांच्या माध्यमातून रोजगार बाधितांची फूड पॅकेट तर आरोग्य विभागातील जे कर्मचारी फ्रंट लाईनला काम करत होते त्यांच्यासाठी मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन व तापमानाची तपासणी करण्यासाठी लागणारे ऑक्सिमीटर व तापमापक गण प्रशासनाला उपलब्ध करून दिले होते, अशी माहिती अनुराग धूत यांनी दिली. स्नेहालय या संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या कोविड सेंटरला ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यावेळी कॅरिअर मायडियाचे प्रतिनिधी गौतम साबळे, निलेश ढगे, प्रशांत दरेकर यांच्या हस्ते ही उपकरणे स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, सहसंस्थापक अजित कुलकर्णी, अनाम प्रेम संस्था, संशोधन, विकास अधिकारी संजय चाबुुुकस्वार, जनसंपर्क
अधिकारी सचिन ढोरमले यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी प्रकल्प प्रमुख उमेश पंडुरे, विष्णू वारकरी, सहाय्यक दत्तू थोरात, बद्रीनाथ कुटे, प्रकल्प सहाय्यक विशाल आहिरे, ओम भगवत, नम्रता गायकवाड आदी उपस्थित होते.
दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पारनेर तालुक्यातील पळवे येथील आरोग्य उपकेंद्रास देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदाम बागल, सरपंच सरिता जगताप, माजी सरपंच नानाभाऊ गाडीलकर, उद्योजक संजय तरटे, कॅरिअर मायडियाचे बाबाजी गायकवाड, निलेश ढगे, अतीश ठोकळ उपस्थित होते.
---
२२ सुपा
सुपा एमआयडीसीतील कॅरिअर मायडिया कारखान्याच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत स्नेहालय संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या कोविड सेंटर देण्यात आली.