सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा, रांजणगाव रोड या ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतींमधील सत्ता राखली, तर नारायनगव्हाण, वाघुंडे खुर्द, वाघुंडे बुद्रूक, बाबूर्डी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी गटाला बहुमतापासून मतदारांनी दूर ठेवले.
नारायणगव्हाण हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून विद्यमान सरपंच सुरेश बोरूडे यांनाच पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला अवघ्या दोन जागांवर विजय मिळविता आला. त्यांच्या विरोधात उतरलेले तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके व आमदार निलेश लंके यांचे समर्थक विनायक शेळके यांच्या गटाला सहा जागा जिंकता आल्या. प्रतीक्षा गणेश शेळके या अपक्ष उमेदवाराला मतदारांनी ग्रामपंचायतीसाठी सदस्य म्हणून संधी दिली आहे.
वाघुंडे खुर्दमध्ये विद्यमान सरपंच संदीप मगर, दादा शिंदे, एक अपक्ष अशा तीन जागा सत्ताधारी गटाला देत उर्वरित चार जागांवर मात्र परिवर्तन करीत ग्रामस्थांनी विरोधी पॅनलला संधी दिली. वाघुंडे बुद्रूकमध्ये सत्ताधारी गटाविरुद्ध वेगवेगळ्या प्रभागात अपक्ष उमेदवारांनी परिवर्तनासाठी दिलेली लढत यशस्वी झाली. सरपंच, उपसरपंच यासारखी पदे भूषवणारी मंडळी व त्यांच्या जवळचे कार्यकर्ते यांना गावकीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात मतदार यशस्वी झाले. प्रभाग एकमधून गणेश रासकर यांनी तीनही अपक्ष उमेदवार निवडून आणले. प्रभाग दोनमधून एक अपक्ष उमेदवाराला संधी मिळाली. त्यामुळे गावची सत्ता अपक्षांच्या हाती गेली.
बाबुर्डी ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगली. त्यात विद्यमान सरपंच गटाला दोन जागांवर विजय समाधान मानावे लागले. प्रकाश गुंड यांच्या पॅनलला पाच जगा देत सत्ता सोपविली. पळवे खुर्दमध्ये संजय तरटे या तरुण नेतृत्वाला पाच जागांसह बहुमताचा आकडा पार करत आला. पळवे बुद्रूकमध्ये गंगाराम कळमकर व माजी सरपंच शिवाजी बापूंच्या टीमने सर्व जागा जिंकल्या. म्हसणे येथेही डॉ. विलास काळे गटाने विरोधकांना दूर करीत बहुमत मिळविल्याने ग्रामपंचायतींची सत्ता हाती घेतली.
रांजणगाव रोड येथे भाजप युवा कार्यकर्ते राहुल शिंदे यांची सत्ता कायम राहिली. शिंदे गटाच्या प्रियंका शिंदे, अलका बनकर यापूर्वीच बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. इतर सहा सदस्यही त्यांनी जिंकले. गटेवाडीमध्ये विद्यमान सरपंच गटाचा सामना करणाऱ्या डी. बी. गट यांच्या पॅनेलने बहुमत मिळविले. मतदारांनी सत्ताधाऱ्यांना पराभूत केले.
-----
सुप्यात गड आला पण सिंह गेला..
सुप्यातील निवडणूक यावेळी लक्षवेधी राहिली. १५ जागांसाठींच्या निवडणुकीत सत्ताधारी सरपंच राजू शेख, सचिन काळे, योगेश रोकडे, कानिफ पोपळघट, सचिन पवार यांच्या गटाला ८ जागा मिळाल्याने सत्ता कायम राहिली. मात्र सरपंच शेख यांचा पराभव झाला. त्यामळे येथे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. प्रभाग पाचमध्ये चुरस होती. तेराशे मतदान असणाऱ्या प्रभागात तीन जागेसाठी १० उमेदवार रिंगणात होते. येथे सरपंच शेख यांना पराभवाचा सामना करावा लागला. अपक्ष उमेदवार सागर मैड यांच्यासह विरोधी गटाच्या प्रीती शिंदे व सत्ताधारी गटाच्या पल्लवी काळे विजयी झाल्या.