सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथील सरपंचपद आरक्षणातील उमेदवार निवडून आलेले नसल्याने येथील पद रिक्त राहिले. सुपा, वाघुंडे खुर्द, गटेवाडी, रांजणगाव, वाळवणे येथे महिला राज आले आहे.
सुपा येथील सरपंच निवडीत मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. बहुमत प्राप्त गटाला सरपंच व उपसरपंचपदाने हुलकावणी दिली. ऐनवेळी राजकीय नाट्यात मनीषा रोकडे यांची सरपंचपदासाठी निवड झाली तर एकमेव अपक्ष उमेदवार निवडून आलेल्या सागर मैड यांना उपसरपंचपदाची संधी मिळाली. वाघुंडे खुर्द येथे रेश्मा सुभाष पवार यांची सरपंच तर मंगल हारकू मगर उपसरपंच झाल्याने दोन्ही पदासाठी महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिल्याचे राजेंद्र मगर यांनी सांगितले. वाघुंडे बुद्रूक येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले व निवडणुकीत याच प्रवर्गातून पुरुष उमेदवार निवडून आले असल्याने ही निवड स्थगित झाली. उपसरपंच पदासाठी लताबाई रासकर यांना संधी देण्यात आली. गटेवाडी येथील निवडणुकीत सत्तारूढ गटाला बाजूला करून परिवर्तन घडवणाऱ्या तालुका सहकारी दूध संघाचे व्यवस्थापक डी.बी. गट यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने सरपंचपदासाठी मंगल चंद्रकांत गट यांना बिनविरोध निवडले. उपसरपंचपदासाठी सुनील पवार यांची निवड झाली. रांजणगाव रोड येथील ग्रामपंचायतीत राहुल शिंदे यांच्या गटाने ८ जागा मिळून बहुमत मिळविले होते. त्यांनी प्रीती साबळे यांना सरपंच तर बाबासाहेब जवक यांना उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवडल्याचे संतोष सरोदे यांनी सांगितले.