सराईत गुन्हेगार अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) याला ४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथून दुपारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर घावटे याला अधीक्षक कार्यालयातील एलसीबी शाखेच्या कार्यालयात आणून त्याची चौकशी करून सोडून दिले. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि.८) वृत्त प्रकाशित करून ही बाब उघडकीस आणली होती. या वृत्ताची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी कटके यांच्याकडे खुलासा मागितला आहे.
निगडी (पिंपरी-चिंचवड) पोलीस ठाण्यात घावटे याच्यासह चौघांविरोधात २१ डिसेंबर २०२० रोजी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना अटक झालेली आहे. घावटे मात्र घटना घडल्यापासून फरार असून निगडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घावटे याच्यावर सुपा, शिरुर, बेलवंडी आदी पोलीस ठाण्यातही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मोक्काचा गुन्हा नजरेआड कसा झाला
बबन घावटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर निगडी पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतर माध्यमांनी वृत्त प्रकाशित केले होते. तसेच सराईत गुन्हेगार ताब्यात घेतल्यानंतर किमान शेजारील जिल्ह्यातील पोलिसांकडे त्याच्याबाबत चौकशी केली जाते. एलसीबी पथकाने घावटे याच्याबाबत काहीच चौकशी न करता त्याला कसे सोडले किंवा कोणत्या कारणामुळे सोडले याबाबतही आता चर्चेला उधाण आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांबाबत टू प्लस योजना राबविली जात आहे. या योजनेतंर्गत गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना बोलावून त्यांची चौकशी करून माहिती संकलित केली जात आहे. बबन घावटे यालाही याच कारणासाठी बोलविण्यात आले होते. मात्र त्याच्याविरोधात जिल्हाबाहेरील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती होती की, नव्हती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक यांच्याकडे खुलासा मागितला आहे. हा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर