राजूर : राजे-रजवाडे, राम लक्ष्मण, गणपती, भोलेनाथ व त्यांचा नंदी आदींबरोबरच पारंपरिक वेषभूषा करत सनई संबळाच्या तालावर त्या तरुणांनी आपले आदिवासी नंदी नृत्य सादर केले आणि त्यांची ही लोककला पाहून जमलेले हजारो भाविक प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले.निमित्त होते अकोले तालुक्यातील जामगाव येथील नवरात्र उत्सवाच्या सांगता समारंभाचे. यावर्षी येथील गणेश मित्र मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने नवरात्रौत्सव काळात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर विजयादशमीच्या सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगणा येथील आदिवासी समाजाचे आदिवासी नंदी नृत्याच्या व घोड्यांच्या नृत्यांच्या आविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दसऱ्याची महाआरती संपली आणि वाजंत्र्यांचा भोंगा आवाज देऊ लागला, पाठोपाठ सनईचे सूरही सुरू झाले आणि संबळावर टिपरे पडू लागली. या संबळाच्या तालावर या नृत्यातील एक-एक पात्र ताल धरत गेले, काळजाचा ठेका चुकवणाऱ्या पदलालित्यांचा आविष्कार एकामागोमाग एक अशी बारा पंधरा पात्रे आपली अदाकारी पेश करू लागले आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनीही त्यांना साथ दिली. त्यांची पारंपरिक बोलीभाषाही उपस्थितांचे आकर्षण ठरत होत्या. यातील नंदी नृत्य उपस्थितांची मने जिंकून गेला.याबरोबरच चिचोंडी येथील तरुणांनी राम-लक्ष्मणाची वेषभूषा परिधान करत सादर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले. रात्री नऊ वाजेपर्यंत चाललेल्या हा कालाविष्कार पाहण्यासाठी राजूरबरोबर परिसरातील रसिकांनी हजेरी लावली. (वार्ताहर)
आदिवासी नृत्याचा अलौकिक आविष्कार
By admin | Published: October 05, 2014 11:52 PM