कोपरगाव : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे इतर औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, त्यामुळे हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाइकांची हेळसांड सुरू आहे, याकरिता रुग्णसंख्येच्या तुलनेत इंजेक्शन, रॅपिड अँटिजन औषधांचा पुरवठा करण्यात यावा तसेच तपासनीची वेळ दिवसभर करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेत केली आहे. तसेच विविध मागण्यांचे निवेदनही दिले आहे.
कोल्हे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी असून एचआरसीटी स्कोरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे स्कोर वाढत असलेल्या रुग्णांना डाॅक्टर्सकडून रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची मागणी होत आहे. हे इंजेक्शन प्रशासनाकडून पुरविण्यात येत आहे. हे पुरवित असताना कोविड सेंटरला असलेली रुग्णसंख्या आणि पुरविण्यात येणारी इंजेक्शनची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. हे इंजेक्शन बाजारात मिळत नसल्याने रुग्ण तसेच नातेवाइकांना मनस्ताप होत आहे.