पाठिंबा? अजित पवार म्हणाले उद्या, शुभांगी पाटलांनी आजच घेतली नानांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:09 PM2023-01-17T19:09:17+5:302023-01-17T19:12:05+5:30
शुभांगी पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आजच भेट घेतली असून यासंदर्भात नानाच मीडियाशी बोलतील. मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचा मला पाठिंबा मिळेल, असे शुभांगी यांनी म्हटले.
अहमनगर/नाशिक - काँग्रेसनेनाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्याचे म्हटले आहे. तर, शुभांगी पाटील यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल असेही अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर आता, शुभांगी पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आजच भेट घेतली असून यासंदर्भात नानाच मीडियाशी बोलतील. मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचा मला पाठिंबा मिळेल, असे शुभांगी यांनी म्हटले.
नाशिकमध्ये कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिक मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. तर, त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्षपणे अर्ज भरला आहे. त्यामुळे, या मतदारसंघात अपक्षांची स्पर्धा लागली आहे. दरम्यान, हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील असेही अजित पवार यांनी म्हटले. तसेच, या जागेसंदर्भात महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक शिक्षक मतदार संघात सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या शुभांगी पाटील यांनी शेगावात जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर झाला असून आता काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी पाटील यांची धडपड सुरू आहे. दरम्यान, काम करणाऱ्याला महाविकास आघाडी संधी देईल, काम करणाऱ्याला जनता संधी देईल, असे विधान पाटील यांनी नाना पटोलेंच्या भेटीनंतर केले आहे.