सुपा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पारनेर तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या ग्रामस्थ, तरुण व महिलांनी नगर-पुणे रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. सुपा बस स्थानक चौकात जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको आंदोलन केले.उपोषणास चार दिवस झाले तरी त्यावर अद्यापि सकारात्मक चर्चा व तोडगा न निघाल्याने कासावीस झालेल्या नागरिक व महिला तरुण यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याजवळून भव्य मोर्चा काढून तो जिल्हाधिकारी कचेरीवर नेण्यात येणार असल्याचे माजी सरपंच जयसिंग मापारी यांनी सांगितले.उपसरपंच लाभेश औटी यांनी मंगळवार पर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही तर मंगळवारी राळेगण सिद्धी परिवार आत्मदहन करील असा इशारा दिला. यावेळी अरुण भालेकर, सुरेश पठारे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, राहुल शिंदे यांची भाषणे झाली. सुनील थोरात, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, दत्ता पवार, शरद पवळे, दादा पठारे उपस्थित होते. तासभर शांततेत झालेल्या अंडलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, उपनिरीक्षक संजयकुमार यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला. तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले शेतकरी, तरुण, महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
अण्णांच्या उपोषणास पाठिंबा : नगर- पुणे रोडवर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 2:21 PM