लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : भैरवनाथ कोविड सेंटर मढेवडगावकरांसाठी (ता. श्रीगोंदा) आधार ठरत आहे. येथून आतापर्यंत ५९ नागरिक काेरोनामुक्त झाले असून, अकरा जणांवर उपचार सुरू आहेत.
मढेवडगाव ग्रामपंचायतीने सरपंच महानंदा मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ एप्रिल रोजी भैरवनाथ कोविड सेंटर सुरू केले. गावातील डाॅक्टर, युवक आणि महिला यांनी कोरोना योद्धा बनून सामाजिक जाणिवेतून काम करत लढा सुरू केला. कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी डॉ. विठ्ठल गवते, डॉ. प्रवीण नलगे, डॉ. अभय शिंदे, डॉ. महावीर भंडारी यांनी मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली. ५० बेडचे हे कोविड सेंटर अवघ्या आठवडाभरात हाऊसफुल्ल झाले.
भैरवनाथ कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा, सेवा उपलब्ध होण्यासाठी राजकीय नेते, ग्रामस्थ, बाहेरील काही दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीचा हात दिला आहे.
कोरोना ग्राम समितीचे अध्यक्ष गणेश मांडे, उपाध्यक्ष दीपक गाडे, समन्वयक अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन उंडे, नाश्ता, जेवणाचा स्वयंपाक करून देणारे आप्पा भोसले, ग्रामपंचायत कर्मचारी शुभम वाबळे, माऊली साळवे, मिनीनाथ ससाणे, शुभम ससाणे, मिठू गटणे असे सर्व स्वयंसेवक या सेंटरमध्ये काम करत होते.
सुवर्णा आप्पा भोसले, डॉ. अशोक शिंदे यांच्या पत्नी अनिता शिंदे, डॉ. पूजा शिंदे, प्राची शिंदे, कविता शिंदे या भगिनी स्वयंस्फूर्तीने सर्व स्वयंपाक करतात. पूजा प्रमोद वाबळे या मोफत दळण देत आहेत.
निखील ईरोळे, अनिल ईरोळे यांनी आपली वाहने मोफत रूग्णसेवेसाठी दिली आहेत. त्या वाहनांतून रूग्णांना घरपोच केले जाते.
त्यामुळे कोविड सेंटरमध्ये रूग्णांना मोफत चांगली सेवा मिळाली आहे. या सेवेमुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या कुटुंबीयांना अडचणीच्या काळात दिलासा मिळाला आहे.
---
२२ मढेवडगाव
मढेवडगाव येथील कोविड सेंटरमध्ये सेवा बजावणारे डॉक्टर, युवक.