हळगाव : 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्तेतील भाजपाने सरकार येताच पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असे अश्वासन दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. काल चौंडी येथे आल्या असता सुळे बोलत होत्या.सुळे म्हणाल्या, सरकारने धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. गेल्या पाच वर्षांत संसदेत महाराष्ट्रातून सातत्याने धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मी आवाज उठवत आलेली आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नसल्यामुळे जनतेनेच त्यांचा विचारावं की क्या हुआ तेरा वादा? राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षातील विलनीकरणाचे निराधार वृत्त देऊ नये. काँग्रेसमध्ये विलीणीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी हे नेहमीच पवार साहेबांना भेटत असतात. त्याच रूटींगनुसार भेट गांधी यांनी नुकतीच पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. दरम्यान इव्हिएम मशीन संदभार्तील बोलताना सुळे म्हणाल्या की, जगात बॅलेट पेपरवर निवडणूका होत असताना भारतात इव्हिएम मशीनचा हट्ट धरता कामा नये. जरी मी लोकसभेत इव्हिएम मशीनद्वारे घेतलेल्या निवडणूकीत निवडून आले असले तरी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरच आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अहिल्यादेवींना अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवास्थानी दोघांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी दोघांचा अहिल्यादेवींची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपा विरूध्द राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष रंगलेला आहे. अश्यातच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी भाजपाच्या मंत्र्यांच्या घरी दिलेली भेट राजकीय निरीक्षकांची भूवया उंचवणारी ठरली. दरम्यान मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी प्रथमच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.
मुख्यमंत्र्यानी धनगर आरक्षणाचा शब्द पाळला नाही : सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:35 PM