अहमदनगर : कोरोना रुग्णांकडून जादा घेतलेली आठ लाख रुपयांची रक्कम अखेर सुरभी हाॅस्पिटलने परत केली आहे. पैसे भरल्याच्या पावत्या हॉस्पिटल प्रशासनाने जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सादर केल्या आहेत. त्यामुळे मनसेने बॅनर दाखविण्याऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ‘लोकमत’नेही रुग्णांचे पैसे परत करण्याबाबत पाठपुरावा केल्याने हॉस्पिटलला जादा रक्कम परत द्यावी लागली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात शनिवारी दुपारी चार वाजता बैठक झाली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक विशाल ढुमे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, सुरभी हॉस्पिटलचे संचालक राकेश गांधी, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, परेश पुरोहित, अनिता दिघे उपस्थित होते.
कोरोना रुग्णांची जास्तीची बिले परत करावीत, अशी मनसेची मागणी होती. यासाठी मनसेने अनेक वेळा आंदोलने केली, तसेच निवेदने दिली होती. जास्तीची बिले आकारणाऱ्यांपैकी एक असलेल्या सुरभी हॉस्पिटलच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार असल्याने मनसे पवार यांच्यासमोर बॅनर झळकविणार होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी मनसेच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेतली. दरम्यान, मनसेच्या शिष्टमंडळाची पवार यांच्याशी भेट घडवून देण्याचेही डॉ. भोसले यांनी आश्वासन दिले. त्यामुळे मनसेने आंदोलन मागे घेतले आहे.
सुरभी हॉस्पिटलकडे पहिल्या टप्प्य्यातील आठ लाख आणि दुसऱ्या टप्प्यातील ३३ लाख रुपयांची वसुली आहे. त्यांपैकी आठ लाख रुपये रक्कम न्यायालयात जमा केली. त्याच्या पावत्या हॉस्पिटलने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्या. तसेच उर्वरित वसुलीबाबत २७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राहिलेली रक्कम रुग्णांना कधी परत होणार, याकडेही लक्ष लागले आहे.
......................................
तीन महिन्यांत पैसे परत करण्याचा आदेश
कोरोना रुग्णांच्या जास्तीच्या बिलांची निश्चित केलेली रक्कम तीन महिन्यांत परत करा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना दिला. रक्कम परत करण्याबाबत रुग्णांचा पत्ता, मोबाईल क्रमांकांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती यावेळी बोरगे यांनी दिली. तसेच तीन महिन्यांत जादा आकारण्यात आलेली रक्कम परत न केल्यास संबंधित हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी भोसले यांनी बैठकीत दिला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची याबाबत कानउघाडणीही केली.