केडगाव : नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला असून असून शुक्रवारी (दि.3) झालेल्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये १३ बाधित रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी ‘लपवा छपवी’ केल्याने बाधितांचा आकडा वाढत आहे.
एकूण ९७ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साकत येथील ७, दहिगाव ४, वाटेफळ १, वाळुंज येथील १ असे एकूण १३ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या अगोदरही दोन दिवसांपूर्वी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यानंतर आणखी टेस्ट घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. यासंदर्भात माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या पाठपुराव्याने तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी दखल घेतल्याने पुन्हा शनिवारी रॅपिड टेस्ट घेण्यात आली.
यामध्ये केलेल्या चाचणीत गावातील आणखी ७ जणांची भर पडली असल्याने गावाकऱ्यांची चिंता वाढली आहे. साकत येथील काही बाधित रुग्णांनी खासगी ठिकाणी टेस्ट केल्या. यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांनी आजार लपवून ठेवला. या आजारी माणसांना अनेक जण भेटल्याने गावातील बऱ्याच जणांना याचा प्रसाद मिळाला. काहींनी पॉझिटिव्ह असल्याचे व्हाॅट्सॲप ग्रुपवर सांगून इतरांना वाचविले. त्यामुळे बाधितांची लपवा छपवीही कोरोना रुग्ण वाढण्यास कारणीभूत ठरली आहे.
याबाबत गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यूही पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
रॅपिड अँटिजन कॅम्प यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे तसेच वैद्यकीय अधिकारी एस. ए. ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत यादव, परिचारिका मनीषा बनसोड, संदीप भालसिंग, आशा सेविका स्वाती पाठक, मीना गायकवाड यासह उपसरपंच बाबासाहेब चितळकर, अविनाश निमसे यांनी परिश्रम घेतले.
---
ग्रामस्तरावरील अधिकारी अनभिज्ञ...
पंचायत समितीचे माजी उपासभापती रवींद्र भापकर यांनी साकत येथे टेस्टदरम्यान प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांना आरोग्य कर्मचारी वगळता तेथे आतापर्यंत एकही ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी फिरकला नसल्याचे लक्षात आले. तसेच संबंधितांना यापूर्वी झालेल्या टेस्टमधील बाधितांची आकडेवारीही दूरध्वनीवरून सांगता आली नसल्याने भापकर यांनी खंत व्यक्त केली.
--
काही लोक खासगीत टेस्ट करतात. खासगीत टेस्ट केलेल्यांचा अहवाल आमच्यापर्यंत यायला उशीर लागतो. खासगीत टेस्ट करून इतरांना न सांगितल्यामुळे या आजाराचा फैलाव जास्त होतो. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळून स्वतःच दक्ष राहणे गरजेचे आहे.
-ज्योती मांडगे,
आरोग्याधिकारी, नगर तालुका