शिर्डी : साईनगरीत नगरपंचायत कर्मचा-यांनी ‘होम टू होम’ जावून डिजीटल थर्मल डिव्हाईसद्वारे नागरिकांची तपासणी करावी. संबंधितांना वेळीच उपाय करण्यासाठी सुचीत करावे, अशा सूचना माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी (२७ मार्च) नगरपंचायत प्रशासनाला दिल्या. कोरोना प्रतिबंधक अनेक उपाययोजनाही मंत्री विखे पाटील यांनी सूचवल्या आहेत. नगरपंचायतीने त्यावर तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेचा भाग म्हणून शिर्डी शहरात तातडीने सोडिअम हायपोक्लोराईटची फवारणी करण्याची सूचना विखे यांनी नगरपंचायतीला केली होती. त्यानुसार नगरपंचायतीने तातडीने सोडिअम हायपोक्लोराइट मागवून शहरात त्याची फवारणी सुरु केली आहे. कोरोनाबाबत अजून परिस्थिती नियंत्रणात आहे. तोपर्यंत शक्य तेवढ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शिर्डी नगरपंचायतीने करणे आवश्यक आहे. शहर स्वच्छता, फवारणी यासोबतच स्वच्छता कर्मचा-यांची देखील विशेष काळजी घेण्याबाबत सूचना विखे यांनी केल्या. त्यांच्या सूचनेनुसार तातडीने सर्व काम सुरु करण्यात आल्याचे पदाधिकारी व अधिका-यांनी सांगितले. सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याने नागरिकांनी दुकानामध्ये गर्दी करू नये. दुकानदारांनीही अशा परिस्थितीत नागरिकांना घरपोच सुविधा द्यावी, असे सुचवतांनाच विखे यांनी नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
साईनगरीत थर्मल डिव्हाईसद्वारे ‘होम टू होम’ सर्व्हे करा; माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगरपंचायतीला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 7:44 PM