सरकारकडे दूध दरवाढीची मागणी अहमदनगर : दूध दरवाढीच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात गायी-बैलांनाही आणण्यात आले आहे. ‘एकच शेट्टी, राजू शेट्टी’ असा नारा कार्यकर्त्यांनी दिल्याने कोठला परिसर गरजला. त्यानंतर मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. यावेळी शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन मागण्या सादर केल्या.केंद्र सरकार आणि राज्य सरकार दुध दरवाढीबाबत कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे यापुढे खासदार-आमदारांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, सुशांतसिंह राजपूत एक चांगला कलाकार होता. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होते आहे, तेवढी चर्चा दुधाच्या प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते. सुशांतसिंह प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह सर्वच पक्षांवरही शेट्टी यांनी टीका केली. ते म्हणाले, राज्यात एकीकडे दूध आंदोलन पेटले आहे. दुसरीकडे भाजप व इतर पक्ष सुशांतसिंह प्रकरणावर जास्त लक्ष दिले जात आहे. राज्यात हजारो शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. त्याबद्दल चर्चा करायला कोणाला वेळ नाही. कोरोनाग्रस्त आॅक्सिजनविना तडफडून मेले आहेत. तिकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एका नटाने आत्महत्या केल्यानंतर जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा दुधाच्या प्रश्नावर, उसाच्या प्रश्नावर, जगण्याबाबत, लॉकडाऊनमुळे ज्या शेतकºयांची घरे उदधवस्त झाली, त्यांच्याबद्दल चर्चा होत नसल्याची खंत शेट्टी यांनी व्यक्त केली.