अहमदनगर: काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे. घरचे उपाशी आणि बाहेरचे तुपाशी अशी सध्या भाजपातील परिस्थिती आहे. ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना आताही राज्यसभेची उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे मुंडे यांनी आता भाजपात जास्त अन्याय सहन न करता शिवसेनेत यावे, असे आवाहन शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
शिवसेनेच्या मुक्त संवाद यात्रेनिमित्त नगर शहरात आलेल्या अंधारे यांनी शनिवारी (दि.१७) येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या. भाजपाला ओबीसीची काळजी असती तर त्यांनी ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सोडवू शकते मात्र, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही. हे सरकार आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वाद लावत आहे.
राज्यात सरकार प्रायोजित दंगली घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे व नितेश राणे यांचे वक्तव्य जनक्षोभ निर्माण करणारे ठरत आहेत. भाजपाने यांना वेळीच आवर घातली नाही तर राज्यातील परिस्थिती बिघडू शकते. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थती मोठे विदारक आहे. याकडे सरकारचे लक्ष्य नाही. असे अंधारे म्हणाल्या. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हा प्रमुख गिरिश जाधव, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते.